...तर महापालिकेत तृतीय पंथीय करणार साडीफेड आंदोलन


महापालिकेने अवमान केल्याने तृतीयपंथीयांचा उपायुक्तांना घेराव

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिका प्रशासनाने तृतीय पंथीय संघटनेला विश्‍वासात न घेता किंवा कुठलीही माहिती न देता मालमत्ता करवसुलीसाठी तृतीयपंथीयांचा सहभाग घेणार असल्याचे परस्पर प्रसिद्धीपत्रक काढून तृतीय पंथीयांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शहरातील तृतीय पंथीयांनी सोमवारी (दि.2) महापालिकेवर मोर्चा नेवून उपायुक्तांना याचा जाब विचारला.

तृतीयपंथीय संघटनेचे अध्यक्ष काजलगुरू यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तृतीयपंथीयांनी महापालिकेत निदर्शने करुन उपायुक्तांना घेराव घातला. त्यामुळे महापालिकेत चांगलाच गोंधळ उडाला होता. महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपुर्वी शहरातील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशा व बॅण्ड वाजविणार तसेच थकबाकी वसुलीसाठी शहरातील तृतीयपंथीयांची मदत घेणार असल्याचा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला होता. त्यानुसार वृत्तपत्रांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. मात्र, प्रशासनाने हे प्रसिद्धीपत्रक काढण्यापुर्वी तृतीयपंथीय संघटनेशी कुठलाही संपर्क केलेला नव्हता तसेच तृतीयपंथीय संघटनेला विश्‍वासात न घेता परस्पर घोषणा केल्यामुळे तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या आहेत. शहरातील अनेक व्यापार्‍यांनी तृतीयपंथीय संघटनेचे अध्यक्ष काजलगुरू यांना फोन करुन ‘‘तुम्ही आमच्या घरी येवू नये तसेच आमचे समाजात बेअब्रू करू नये,’’ अशा विनवण्या केल्या जात आहेत. तृतीयपंथी संघटना महापालिकेच्या थकबाकी वसुलीचे कुठलेही काम करणार नाही यापुर्वीही असे काम केलेले नाही तसेच पुढील काळातही करणार नाही, असे असतानाही प्रसिद्धीपत्रकाद्वारे तृतीय पंथीयांच्या भावना दुखवत अवमान केल्याप्रकरणी लेखी खुलासा द्यावा, अशी मागणी यावेळी उपायुक्तांकडे करण्यात आली. महापालिका प्रशासनाच्या या कृत्याचा तृतीयपंथीयांच्यावतीने जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला. त्यानंतर उपायुक्तांनी जाहीर दिलगीरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

तर, साडीफेड आंदोलन करू
आम्ही चार घर मागून जीवन जगतो शासन आमच्यासाठी काहीही करत नाही मग आम्ही तरी या शासनाचे काम का करायचे? आमची परवानगी न घेता परस्पर आम्हाला गृहित धरणे योग्य नाही. आम्ही आज प्रेमाने सांगायला आलो आहोत यापुढे जर पुन्हा असे झाले तर महापालिकेच्या दारात साडीफेड आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी काजलगुरू यांनी दिला. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post