बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - राठोड


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे 4 महिन्यांपूर्वी करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता उखडला आहे. त्यामुळे शासनाच्या पैशांची लुट करणार्‍या ठेकेदारावर आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी मंगळवारी (दि.3) दुपारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अशोक बडे, निलेश भाकरे, दत्ता सप्रे, आकाश कातोरे, मदन आढाव, संजय शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राठोड म्हणाले, उपनगरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम चार महिन्यापुर्वी ठेकेदारामार्फत झाले होते, त्यावेळी हे काम अत्यंत नित्कृष्ट स्वरुपाचे साहित्य वापरल्यामुळे व हा रस्ता लगेचच खराब झाला असल्याने शिवसेनेने मोठ आंदोलन केले होते व त्या आंदोलनात आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.

हे आंदोलन झाल्यानंतर संबंधीत ठेकेदार याने तात्पुरती जुजबी दुरुस्ती करुन कामचलाऊ पध्दतीने रस्त्याचे काम पुर्ण केले व रस्ता तयार केला. परंतु आता अवघ्या चार महिन्यातच हा रस्ता पुर्णपणे उखडला गेला असून या रस्त्यावर मोठ मोठे खडडे पडले असून रस्ता तयार करतांना टाकलेले गज पुर्णपणे बाहेर आलेले असल्याने व रस्त्यावर मोठे खडडे पडण्यास सुरुवात झाली असल्याने यात झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाकण्यासाठी त्यावर पांघरुण घालण्यासाठी या ठेकेदाराने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली फक्त सिमेंटचे पाणी ओतुन उघडे पडलेले खडडे व गज बुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदरील रस्त्याच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून शासनाच्या पैशांची लुट करण्यात आलेली आहे. तरी या कामाची निष्पक्षपणे चौकशी करुन महापालिकेचे संबंधित अधिकारी या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार आणि त्यास साथ देणार्‍यांची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून करावी आणि संबंधीत अधिकारी, ठेकेदार याच्यावर झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी त्वरीत गुन्हे दाखल करावेत. अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही अनिल राठोड यांनी यावेळी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post