'या' कारणामुळे जिल्ह्यातील 603 शाळांचा वीजपुरवठा खंडित



जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून वीजबील भरावे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा 100% डिजिटल होत आहेत, मात्र तेथे वीज नसेल तर काय उपयोग? विद्युत उपकरणे धूळखात पडतील. जिल्हात निम्म्या शाळांचे वीजबिल थकले असून सेस निधीमधून ते भरावेत. अनुदान मूल्यनिर्धारणं न केल्यामुळे जिल्ह्याला सादिल मिळत नाही तो मिळावा, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळांपैकी सुमारे 1,663 शाळांकडे विज बिल थकलेले आहे. एकूण थकीत वीज बिलाची रक्कम तब्बल 60 लाख 81 हजार 762 रुपये इतकी आहे. यापैकी 71 ग्रामपंचायतींनी वीज बिलाचा भरणा केलेला आहे. तर वीज बिल थकल्यामुळे वीज पुरवठा करणार्‍या कंपनीने जिल्ह्यातील सुमारे 603 शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, असे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.

काळाची पावले ओळखून तसेच इंग्रजी शाळांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान अद्यावत करण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यांमध्ये मिळून एकूण 3,573 शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान अवगत केलेले असल्याने वीज बिलाची थकबाकी ही वाढत आहे. काही तालुक्यांमध्ये सर्व शाळा वीजबिल नियमितपणे भरतात.

परंतु काही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज बिल थकलेले आहे. या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कोपरगाव, पारनेर, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे वीजबिल थकलेले असले तरी त्यांचे विजेचे कनेक्शन खंडित करण्यात आलेले नाही, अशी माहिती विधानसभेत तारांकित प्रश्नावर दिलेल्या आकडेवारीनुसार उपलब्ध झालेली आहे.

अकोले तालुक्यात 186, जामखेड तालुक्यात 113, कर्जत तालुक्यात 184, कोपरगाव तालुक्यात 75, नगर तालुक्यात 117, नेवासा तालुक्यात 175, पारनेर तालुक्यात 58, पाथर्डी तालुक्यात 92, राहता तालुक्यात 80, राहुरी तालुक्यात 69, संगमनेर तालुक्यात 73, शेवगाव तालुक्यात 92, श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 26, तर श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 323 जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल थकलेले आहे.

अकोले तालुक्यात 13 ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळांचे थकीत बिलाची वीज देयके अदा केलेली आहे तर राहता तालुक्यात 53 ग्रामपंचायती जिल्हा परिषद शाळांची थकित वीज बिले केलेली आहेत तरीही या तालुक्यातील 18 शाळांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहे. नगर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 14 जिल्हा परिषद शाळांचा विद्युत पुरवठा विजेच्या थकबाकी पोटी खंडीत केलेला आहे.

अकोले तालुक्यात एकूण 390 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी तब्बल 186 शाळांनी विज बिल थकलेले आहे. थकलेल्या बिलाचा आकडा 2 लाख 76 हजार 800 इतका आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 173 शाळांची विजेचे कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post