स्वामी तिन्ही जगाचा ‘कोरोनातून’ सोडवशील कधी


प्रशासनाचा आदेश पाळून भक्तांकडून स्वामींची आरती
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भगवंत भक्तांच्या हाकेला धावतो, भक्ताने केलेल्या प्रार्थनेला मी धावून येतो. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ असे श्री स्वामी समर्थ भक्तांना म्हणतात आज संपूर्ण जगात कोरोनाच्या भितीमुळे कोट्यावधी लोक भयभित झाले आहेत. स्वामी तिन्ही जगाचा ‘आई’ विना भिकारी या उपदेश आपण ऐकतो, त्याप्रमाणे आज आम्ही श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करतो की, स्वामी तिन्ही जगाचा ‘कोरोनातून’ सोडवशील कधी’ अशी आर्त हाक स्वामी भक्तांनी दिली आहे.

सावेडी येथील गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार गर्दी न करण्याचा आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद देऊन बाहेरुनच गर्दी न करता दर्शन घेतले. गुरुवारी सायंकाळी आरतीसाठी पाच पेक्षा भाविक नकोत या आदेशाचे सुद्धा पालन करण्यात आले. दर गुरुवारी भाविक आरती व महाप्रसादाला येतात.

परंतु मंदिराचे सचिव सुनिल मानकर यांनी गुरुवारी सकाळीच सूचना फलकावर प्रशासनाने केलेले आवाहन लिहिले. त्याप्रमाणे मंदिर बंद ठेवून भाविकांनीही गर्दी न करता सायंकाळी बाहेरुनच दर्शन घेतले. यावेळी आरतीसाठी मंदिरात फक्त पाचच भाविक उपस्थित होते. आरती झाल्यानंतर भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली की, लवकरात लवकर या कोरोनातून संपूर्ण जगाची सुटका करा.

सचिव मानकर यांनी सांगितले की, इतिहासात प्रथमच संपूर्ण भारतातील मंदिरे बंद ठेवण्याची वेळ या कोरोनामुळे आली. श्रीराम जन्मोत्सव, स्वामी समर्थ प्रकट दिन, यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सार्वजनिक कार्यक्रम, विवाह देखील रद्द करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करुन खबरदारी घेतली तरच लवकरात लवकर करोनाची ही महामारी स्वामींच्या कृपेने बंद होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post