माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अहमदनगरमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. या रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण दुबईहून आलेल्या एका गटातील आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
राज्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच, आता ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्यापाठोपाठ आज अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. नगरमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाची प्रकृती स्थिर असून अद्याप सर्दी,ताप,खोकला अशी लक्षणे आढळून आलेली नाहीत.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
Post a Comment