50 हजारांची लाच घेताना लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – खंडकरी शेतकर्‍याचे कुळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावुन देण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी करून ते स्विकारणार्‍या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.9) सकाळी 11.30 च्या सुमारास रंगेहाथ पकडल्याची घटना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपुर येथील एका खंडकरी शेतकर्‍याचे प्रकरण कायदेशीर मान्यतेसाठी कुळ कायदा शाखेत वर्ग झाले होते. या प्रकरणाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा विभागातील लिपिक सुनील बाबुराव फापाळे (वय-48) याने त्या शेतकर्‍यास 50 हजार रूपयांची लाचेची मागणी केली.

याबाबत शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, पोलिस हवालदार तनवीर शेख, चालक पोलिस हवालदार हारूण शेख, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलिस राधा खेमनर यांनी केली आहे.

जर कोणी लोकसेवक शासकीय कामाकरीता लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक नगर विभाग (फोन नं. 0241-2423677 व टोल फ्री क्रमांक 1064) यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सुनील फापाळे याच्या विरूध्द दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post