माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अहिल्यानगर मधील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. कोरोना काळात खोटा कोरोना रिपोर्ट तयार करून चुकीचे उपचार देऊन ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू घडवला, त्यानंतर अवयवांची तस्करी करून मृतदेह लपवले असा गंभीर आरोप आहे.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात सहा डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पाच वर्षांच्या संघर्षानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला होणार असून, तपास सखोल सुरू आहे.
२०२० च्या ऑगस्ट-नोव्हेंबर महिन्यात शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला. फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे (वय ४७, रा. सावेडी) यांच्या वडील बबनराव खोकराळे (वय ७९) यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना कोरोना झाल्याचा खोटा रिपोर्ट तयार करून चुकीचे उपचार दिले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर कुटुंबाला माहिती न देता मृतदेह लपवले आणि अवयवांची तस्करी केली असा आरोप आहे. कुटुंबीयांना मृतदेह मिळाले नाही, ज्यामुळे त्यांनी पाच वर्षे न्यायासाठी कोर्टाची पायरी चढली. उच्च न्यायालयाने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश देत गुन्हा दाखल करण्यास सांगितले, ज्यामुळे शनिवारी संध्याकाळी तोफखाना पोलीसांनी कारवाई केली.
डॉ. गोपाळ बहुरूपी (रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर), डॉ. सुधीर बोरकर, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ज्ञ डॉक्टर अशी आरोपींची नावे आहेत.
या डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, अभियोजन आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने जामीन फेटाळला. या घटनेने अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, आरोग्यसेवेच्या नावाखाली गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची चर्चा आहे.

Post a Comment