आज अर्थमंत्री सीतारमण सादर करणार अर्थसंकल्प; सरकार म्हणतंय, तुमची थाळी स्वस्त झालीय!



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. यात शाकाहारी व मांसाहारी थाळीच्या घटत्या किमतींचा उल्लेख केला आहे. २००६-२००७ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये शाकाहारी जेवणाची थाळी २९ टक्के तर मांसाहारी थाळी १८ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. यासाठी एप्रिल २००६ ते आॅक्टोबर २०१९ पर्यंत २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ८० केंद्रांतून औद्योगिक श्रमिकांसाठीच्या ग्राहक मूल्य निर्देशांकातून घेतलेल्या किमतींचा वापर केला आहे. तथापि, किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचलेला आहे.

आज अर्थमंत्री सीतारमण सादर करणार अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२०-२१ वित्तवर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

पाच सदस्यांच्या कुटंुबाची १० हजारांपेक्षा जास्त बचत
आर्थिक सर्वेक्षणानुसार, ५ सदस्य असलेल्या सामान्य कुटुंबाला दोन पौष्टिक थाळींच्या जेवणात वार्षिक सरासरी १०,८८७ रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच दरवर्षी त्यांची इतक्या रकमेची बचत झाली आहे. दुसरीकडे, मांसाहारी जेवण करणाऱ्या पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरवर्षी सरासरी ११,७८७ रुपयांचा फायदा झाला आहे. तथापि, या किमतींत २०१९ मध्ये तेजी दिसून आली आहे.

४ कोटी रोजगार निर्मिती
पुढील ५ वर्षांत ४ कोटी रोजगार निर्मितीसाठी चीनचा फाॅर्म्युला अवलंबण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. मेक इन इंडियात असेम्बल इन इंडिया फॉर वर्ल्डचा समावेश केल्याने २०२५ पर्यंत चांगल्या पगाराच्या ४ कोटी, तर २०३० पर्यंत ८ कोटी नोकऱ्या देता येतील, असे सर्व्हेत म्हटले आहे.

६ ते ६.५ टक्के विकासदर
सर्व्हेनुसार, २०२०-२१ मध्ये जीडीपी विकासदर ६ ते ६.५% पर्यंत जाऊ शकतो. २०१९-२० मध्ये तो ५% राहू शकतो. सरकारने १.८४ लाख कोटी रुपयांच्या अन्न सबसिडीत कपात करावी. तसेच संपत्ती आणि व रोजगाराचे सृजन करणाऱ्या उद्योगपतींकडे सन्मानाने पाहावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post