सर्वसामान्यांना रडवणारा ‘कांदा’ आता शेतकर्‍यांना रडवतोय



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणारा कांदा आता शेतकर्‍यांना रडवत आहे. दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये तब्बल सहाशे रुपयाची घसरण झाली आहे. ऐतिहासिक भावाची मजल मारणारा कांदा आता मातीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. शेतकर्‍यांना रडवणार्‍या कांद्याचे दर गडगडले असून कांदा प्रतिक्विंटल दोन-अडिच हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे.

लासलगावात 700 ते 2152 रुपये प्रतिक्विंटल, राहुरीत 100 ते 2100, संगमनेर 500 त 2511, राहाता 500 ते 2300 रुपयांचा दर मिळाला. लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने कांद्याने दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलोचा टप्पा पार केल्याने केंद्र सरकारने तुर्कस्तानातून कांदा आयात केला होता. हॉटेल व्यवसायिकांकडून या कांद्याला मागणी होती, मात्र आता बाजारात कांद्याची आवक वाढू लागल्याने दर झपाट्याने कोसळले आहे.

यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. यंदा देशात गेल्यावर्षीपेक्षा 16 लाख टनाने कांद्याचे उत्पादन वाढणार असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. कांदा उत्पादन वाढीमध्ये नाशिक आणि नगर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. दररोज कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्याने घसरण थांबविण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवण्याकडे नजरा लागल्या आहेत.

दहा ते बारा आठवड्यापूर्वी गगणाला भिडलेले कांद्याचे भाव अचानक 18 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. परदेशातून आयात केलेला कांदा तसेच महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटकमध्ये रांगड्या कांद्याचे घेतलेले उत्पन्न यामुळे बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. याचा परिणाम कांद्याचे दर कोसळण्यात झाला आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास येणार्‍या काही आठवड्यात महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post