कर्जमाफीची यादी आज जाहीर होणारमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अधिवेशन असून विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे.

शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या, सोमवारी जाहीर करणार येणार आहे. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. कर्जमुक्ती संदर्भात राज्यातील 35 लाख शेतकर्‍यांची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. 20 हजार शेतकर्‍यांचे अकाऊंट असतील. हीच यादी उद्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकर्‍यांची यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नगर जिल्ह्यातील राहुरीतील ब्राम्हणी आणि जखणगावचा समावेश आहे.

दरम्यान, आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी, हिंगणघाट जळीतकांड, धनगर आरक्षण, महिलांच्या सुरक्षितता, मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी, सुधारित नागरिकत्व कायदा आदी विषय या अधिवेशनात मांडत विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर केला जाणार आहे.

विरोधकांच्या सर्वच प्रश्नांना मी उत्तर देत नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले. विरोधाला विरोध करू नये, या सरकारचे हे पहिलंच मोठं अधिवेशन आहे. हे सरकार आता स्थिरावल आहे, हेच विरोधकांना पचनी पडत नाही आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड व्हावी, यासाठी नवे विधेयक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडणार आहे. तसेच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तांतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकार विधेयक मांडणार आहे.

एक गोष्ट विरोधी पक्षाला मानावी लागेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगे झालेले नाहीत, पण जिथे त्यांचे सरकार आहे, तिथे दंगे झालेले आहेत. असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाबद्दल कोर्टात जी लढाई आहे ती पूर्ण ताकदीनिशी राज्य सरकार लढत आहे. सरकार ही न्यायाची लढाई सरकार जिंकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे-पवार यांची बंद दाराआड चर्चा
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बंद दाराआड चर्चा केली. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी व राष्ट्रीय नागरिक नोंदणी यांमधील आक्षेपार्ह भागाबाबत केंद्राशी चर्चा करण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्यानंतर ही बैठक पार पडली अशी माहिती राज्यातील एका बड्या नेत्याने दिली.अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपतर्फे कोणते मुद्दे उपस्थित केले जातील याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये फूट पडू नये यासाठी तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेते प्रयत्नशील असल्याची माहिती देखील या नेत्याने दिली.

सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या नगर जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांची संख्या

जिल्हा बँक पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची संख्या 2 लाख 15 हजार 836,पुनर्गठण केलेले शेतकरी 2 हजार 389 संख्या कंसात

अकोले 14 हजार 980 (0), जामखेड 11 हजार 530 (70) , कर्जत 10 हजार 418 (120), कोपरगाव 6 हजार 473 (50), नगर 14 हजार 999 (20), नेवासा 21 हजार 937 (652), पारनेर 20 हजार 448 (20) , पाथर्डी 11 हजार 113 (113), राहाता 9 हजार 539 (41), राहुरी 14 हजार 410 (89), संगमनेर 18 हजार 383 (0), शेवगाव 17 हजार 535 (356), श्रीगोंदा 34 हजार 105 (541), श्रीरामपूर 9 हजार 966 (309) या शेतकर्‍यांतून निकषात न बसणारे शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि अन्य शेतकर्‍यांना वगळून कर्जमाफी देण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post