कागदपत्रे अखेर पुणे पाेलिसांकडून एनआयएच्या ताब्यात



माय अहमदनगर वेब टीम
पुणे - एल्गार परिषद आणि संशयित माआेवादीप्रकरणी विश्रामबाग पाेलिस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात पुणे पाेलिस तपास करत असलेली कागदपत्रे अखेर मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए)ताब्यात देण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून एनआयएचे आयपीएस अधिकारी विक्रम खलाटे यांच्यासह पाच ते सहा जणांचे पथक पुण्यात तळ ठाेकून हाेते.

पुणे पाेलिस आयुक्तालयात एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांनी एल्गार प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पाेलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडून संबंधित प्रकरणाचे बारकावे समजून घेतले. तसेच अटक करण्यात आलेल्या संशयित माआेवादी आराेपींकडून जप्त करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पत्रांबाबतची तसेच त्यातील मजकुराची माहिती करून घेत त्याबाबतची कागदपत्रे एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतली. काेणकाेणती कागदपत्रे एनआयएला देण्यात आली आहेत, यासंदर्भात एनआयएने एक तक्ता करून त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पुढील तपासासाठी क्रमवारीनुसार वेगवेगळ्या बाॅक्समध्ये पॅकिंग केली. पाेलिसांनी या प्रकरणात न्यायालयात एकूण १५ आराेपींविराेधात आतापर्यंत दाेषाराेपपत्र दाखल केले असून त्याबाबतची सविस्तर माहिती एनआयएने घेऊन दाेषाराेपपत्राच्या प्रतीही ताब्यात घेतल्या आहेत.


न्यायालयाच्या माध्यमातूनच कागदपत्रांचे हस्तांतरण
पाेलिसांनी संशयित आराेपींच्या घरातून जप्त केलेला इलेक्ट्राॅनिक डाटा आणि प्रयाेगशाळेत तपासणीसाठी दिलेली कागदपत्रे याबाबतची माहिती घेऊन संबंधित गाेष्टी जमा करून घेतल्या आहेत. पुणे विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएच्या मुंबई विशेष न्यायालयात हाेईल, असे आदेश दिल्यानंतर याप्रकरणी न्यायालयात आतापर्यंत जमा करण्यात आलेली कागदपत्रे न्यायालयाच्या माध्यमातूनच मुंबई न्यायालयात हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post