रोझव्हॅली पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी शाहरुखला 'ईडी'चा दणका
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : रोझव्हॅली पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याला सक्तवसुली संचनालयाने (ED) दणका दिला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंग अंतर्गत शाहरुख खानच्या आयपीएल कंपनीसहीत एकूण ३ कंपन्यांची ७० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आहे.
रोझव्हॅली समूहाशी संबंधित कंपन्यांवर 'ईडी'कडून कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणी 'ईडी'ने ४७५० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मल्टीपल रिसॉर्ट, सेंट झेवियर कॉलेज आणि नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांच्या एकूण ७०.११ कोटींच्या मालमत्तेवर आज 'ईडी'ने टाच आणली आहे. तसेच या कंपन्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. नाईट रायडर्स स्पोर्ट्स ही शाहरुख खानची कंपनी आहे. या कंपनीत शाहरुख, पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावला, तिचे पती जय मेहता आणि वेंकटेश म्हैसूर हे संचालक आहेत. आज 'ईडी'ने पश्चिम बंगालमधील पूर्व मदिनापूर जिल्ह्यातील रामनगर आणि महिशदल भागातील २४ एकर जमीन, ज्योती बसू नगरमधील एक एकर जागा, एक हॉटेल आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त केला आहे. मनी लाँडरिंग अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पॉन्झी योजनेतील घोटाळ्यात यापूर्वीच पश्चिम बंगाल पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. जवळपास १७५२० कोटींचा हा घोटाळा आहे. रोझव्हॅली समूहाशी संबंधित कंपन्यांवर आता तपास यंत्रणांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्याचे प्रमुख गौतम कुंदू यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.
Post a Comment