महापालिकेतील वकिलांचे पॅनेल रद्द, नवीन पॅनेलमध्ये महिलांना संधी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेसंदर्भातील न्यायालयीन दाव्यांचे काम पाहण्यासाठी नेमण्यात आलेल्या 11 वकिलांचे पॅनेल रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत सोमवारी (दि.24) घेण्यात आला. वकिलांचे सध्याचे पॅनेल न्यायालयीन दावे लढण्यात कमजोर पडत असल्याने अनेकदा महापालिकेच्या विरोधात निकाल येत असल्याने सध्याचे पॅनेल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मानधनावर नवीन पॅनेल नियुक्त करताना 50 टक्के महिलांना संधी देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि.24) सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस सदस्य गणेश भोसले, सुभाष लोंढे, योगीराज गाडे, आशाताई कराळे, सोनाली चितळे, सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.

महापालिकेसंदर्भात न्यायालयात अनेक खटले, दावे सुरू असतात परंतु अनेकदा निकाल विरोधात गेल्याने महापालिकेवर नामुष्की ओढावते सध्याच्या पॅनेलमधील अनेक वकिलांना न्यायालयात साधा अर्जही लिहिता येत नाही; टीपीच्या कामात संगनमत करुन वकिल नागरिकांची लूट करतात, असा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे सध्याचे वकिलांचे पॅनेल रद्द करुन नव्याने पॅनेल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर भुयारी गटार योजनेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सदस्यांनी केली. या योजनेचे काम रखडल्याने रस्त्यांची कामे करता येत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहे. येत्या आठ दिवसात भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकीमुळे महापालिकेने तीन ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद केला आहे. या ग्रामपंचायतीकडे असणारी मागील आणि चालू थकबाकी वसूल करण्याच्या सूचना सभापतींनी प्रशासनाला दिल्या. महापालिका कर्मचार्‍यांच्या गणवेश खरेदीच्या विषयाला सभेत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर वृक्षकर स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post