दिल्लीच्या हिंसाचाराचा अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- दोन महिन्यापासून शांततेने सुरु असलेल्या एनआरसी व सीएए विरोधात आंदोलनास दिल्ली मध्ये काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले असून, यामध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. पोलीसांकडून देखील आंदोलकांवर दडपशाही केली जात असल्याचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला. तर या मागील शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीचे निवेदन प्र.निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांच्या माध्यम ातून केंद्र व दिल्ली राज्य सरकारला देण्यात आले. संपूर्ण भारतात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सर्व जाती, धर्माचे नागरिक एनआरसी व सीएएला विरोध करीत आहे. यासाठी दिल्लीच्या शाहीनबाग मध्ये दोन महिन्यापासून शांततेने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु आहे. त्याचप्रमाणे दिल्लीच्या जाफराबाद येथे आंदोलन होत असताना काही समाजकंटकांनी या आंदोलनास हिंसक वळण देऊन दिल्लीत दंगली पेटविल्या आहेत.

यामध्ये निष्पाप नागरिकांची हत्या होत असून, राष्ट्रीय मालमत्तेचे देखील नुकसान होत आहे. पोलीसांनी परिस्थिती योग्य रितीने हाताळण्या ऐवजी आंदोलकांवरच अत्याचार सुरु केला असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. आंदोलन करणार्‍या मुस्लिम समाजासह इतर समाजातील आंदोलकांवरील अत्याचार त्वरीत थांबवावे, दंगल पेटविणार्‍या खर्‍या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अहमदनगर शहरासह देशातील विविध भागात एनआरसी व सीएए विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असून, ही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम समाजातील उद्योजक, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post