गावठी कट्टा बाळगणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या तिघांना संगमनेर पोलिसांनी धाडसाने अटक केली. ही कारवाई नाशिक- पुणे महामार्गावर गुरूवारी (दि.13) रात्री करण्यात आली.

नाशिक-पुणे महामार्गावरून काही तरूण गावठी कट्टे घेवून जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली. यावरून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक कवडे यांच्यासह एक टिम तयार केली व पोलिसांना नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी शिवारात असणार्‍या टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा रचला. परंतु टोल नाक्यावर कामगार असणार्‍या सारखे दिसणारे तिघेजण कामगारांसारखे वागत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिघांच्या गाडीवर धाड टाकून गाडी तपासली असता एकच गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखुन तिघांवर पिस्तुल रोखले व स्वत: जीव धोक्यात घालुन तिघांना अटक केली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव दयानंद तेलंग, दीपक खाडे, बाबासाहेब गुंजाळ (पुर्ण नाव माहित नाही, रा. शिरूर) अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडुन तीन गावठी कट्टे, 38 काडतुस व एक स्कार्पिओ गाडी जप्त केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे, पोलिस नाईक विजय पवार, श्री. साबळे, पो.कॉ. सुभाष बोडखे, पो.कॉ. अमृता आढाव, पो.कॉ. प्रमोद गाडेकर, साईनाथ तळेकर यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post