संगमनेरात रंगल्या युवा आमदारांच्या मुुलाखती
माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर – संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात नव्याने निवडून आलेल्या महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी यांना बोलतं केलं. यातून बेधडक आणि मिश्किल जुगलबंदीही रंगली. यावेळी या नेत्यांनी हजरजबाबी उत्तरं दिली आणि उपस्थितांची मनं जिंकून घेतली. दिलखुलास उत्तरांनाही उपस्थित तरुणाईने भरभरून दाद दिली.यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजितभाऊ थोरात, विश्वस्त शरयुताई देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या मुलाखतीची सुरुवात ‘इस बंदे मे है कुछ बात, ये बंदा लय जोरात, बाळासाहेब थोरात’ या गीताने टाळ्यांच्या कडकडात झाली.
काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष जनतेचा
विचार करणारे – आदित्य ठाकरे
राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं सोपं आहे, असे मत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकांचे संकेत देत मित्रपक्षांशी अशीच दोस्ती कायम असणार का? असा सवाल विचारला. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत. मित्र काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. विलासराव देशमुखांनी कधीही ग्रेस सोडली नाही. आम्ही विरोधात असतानाही त्यांच्यासोबतच आहोत असे वाटायचे. याशिवाय शरद पवार साहेब आणि माझे आजोबा (बाळासाहेब ठाकरे) यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीत वेगळच प्रेम होते. आता आमचेही वेगळे नाते निर्माण झाले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकांचे पक्ष असे म्हणले जाते, परंतु वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन पक्ष जनतेचा विचार करणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मैत्री, नाती एकत्र आली आहेत. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये बदल घडला आहे. देशाचे चित्र बदलत आहे. भविष्यात आणखी बदल होतील. यातून असे संकेत मिळत आहेत की राज्यात जिल्हा परिषद निवडणूकांपाठोपाठ आगामी काळात मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढू शकतात.
राहुल गांधीच्या भेटीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी राहुल गांधींना भेटलो, त्यांच्याशी बोललो. विचार वेगळे असतील, मात्र विकास हे ध्येय समान आहे.
बाबा लगीन ठरवणार…
आदित्य आणि अभिनेत्री दिशा पटनी यांच्या मैत्रीबद्दल कायम चर्चा होत असते. अनेकदा त्या दोघांचे फोटेही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातल्या मनमोकळ्या चर्चेत लग्नाचा विषय आला नसता तरच नवल. त्यावर जुगलबंदी रंगली. मात्र एका प्रश्नावर आदित्य क्लिन बोल्ड झाल्याचं बघायला मिळालं. या संवादाला तरुणाईचीही चांगलीच दाद मिळाली.
अवधूत गुप्ते म्हणाले की, आईने किती दिवस आता जबाबदारी घ्यायची? त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न अवधूतने विचारला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरच्या चर्चेचा उल्लेख करत हिंदीत कमेंट केली. आपका उत्तर हमको ‘पटनी’ चाहिये? असं म्हणत त्याने दिशा पटनी आणि आदित्यबद्दलच्या चर्चेचा उल्लेख केला, त्यावर आदित्यनेही अवधूतला तुझ्या प्रश्नांची ‘दिशा’ चुकली असे सांगून वेळ मारून नेली. त्यांचा यावेळी झालेला लाजराबुजरा भाव तरूणाईला चांगलाच भावला.यावर प्रेक्षकांमधून तरुणांनी दिशा…दिशा…अश्या घोषणा दिल्या.
संगमनेरातून रोहित पवारांनी
केला मोदींना फोन!
महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. खुद्द मोदींनीही बारामतीतील कार्यक्रमात पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे म्हटले होते. याच पवारांच्या नातवाने व्यासपीठावरून थेट पंतप्रधान मोदींना फोन लावला आणि ‘मोदी साहेब नमस्ते, मी रोहित पवार बोलतोय…नाव आपण ऐकलं असेल’, असे मराठीत विचारताच सभागृहात उपस्थितांनी एकच आरोळी ठोकली.
संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा – 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दोघांची गायक अवधूत गुप्ते यांनी मुलाखत घेतली.

Post a Comment