200 गडकिल्ले सर करणारे पीटर गिट साधणार नगरकरांशी संवाद





माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर  – छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आणि सह्याद्रीच्या कुशीतील 200 गडकिल्ले 2 महिन्यात सर करणारे युरोपातील नागरीक व प्रशिक्षित-कुशल गिर्यारोहक पीटर व्हॅन गिट सोमवारी (दि.13) नगरकरांशी संवाद साधणार आहेत.

ट्रेक कॅम्प डिस्कव्हर अननोनचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या पुढाकारातून नगरकरांना गडकिल्ल्यांचा अनुभव कथनाची मेजवानी मिळणार आहे. कलेक्टर राहुल द्विवेदी आणि प्रभारी एसपी सागर पाटील हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बेल्जियम देशाचे नागरिक असलेल्या पीटर यांना पर्यटन आणि गिर्यारोहणाची प्रचंड आवड आहे. त्यांच्या या आवड वजा छंदाला महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या रांगांनी आणि किल्ल्यांनी कमालीची भुरळ घातली. अवघ्या 2 महिन्यांत त्यांनी 200 गड-किल्ल्यांना साद देत जणू सह्याद्रीला आपलंसं केलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची आणि पदाची नोकरी सोडून आपले जीवन गिर्यारोहणाच्या आवडीला समर्पित केले आहे.

त्यांच्या अनुभवांचा आणि कौशल्यपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ नगरकरांना व्हावा यासाठी ट्रेकॅम्प डिस्कव्हर अननोन संस्थेने पुढाकार घेतला आहे. आरोग्य आणि निसर्ग यांचा मेळ साधून पर्यटनाबाबत जनजागृती वाढावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ट्रान्स सह्याद्री ही मोहीम पार पाडत असताना आलेले अनुभव कथन करून पीटर नगरकरांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत.

या वेळी जिल्हाधिकारी द्विवेदी व पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते पीटर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुलमोहर रस्त्यावरील आम्रपाली गार्डन येथे सोमवारी (दि. 13 जानेवारी) सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होत असल्याचे ट्रेकॅम्पचे विशाल लाहोटी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post