महापालिका पोटनिवडणूक : वर्षा सानप आऊट
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – सावेडीतील सहा नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत वर्षा सानप यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने पल्लवी जाधव या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेच्या अनिता दळवी आणि भाजपच्या पल्लवी जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वार्डातील आरक्षित जागेसाठी पोटनिवडणूक होत असून 6 फेबु्रवारीला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल मंगळवारी शेवटच्या दिवशी सेनेच्या अनिता दळवी आणि भाजपकडून वर्षा सानप, पल्लवी जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. दाखल झालेल्या अर्जाची छाननी आज निवडणूक निर्णय अधिकारी अशीमा मित्तल यांनी केली.
सानप यांचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. पल्लवी जाधव यांच्याही अर्जाला शिवसेनेने आक्षेप घेतले. शौचालयाचा दाखला नसणे, प्रतिज्ञापत्रातील माहिती अपुरे असल्याचे सांगत सेनेना जाधव यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. महापौर बाबासाहेब वाकळे, सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते छाननीवेळी उपस्थित होते. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मित्तल यांनी आक्षेप फेटाळून लावत जाधव यांचा अर्ज वैध ठरविला.
सहा नंबर वार्डातील या पोटनिवडणुकीत आता सेनेच्या दळवी आणि भाजपच्या पल्लवी जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे. वार्डातील तीन नगरसेवक हे भाजपचे असल्याने ही जागा राखण्यासाठी महापौरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सेनेनेही ही जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्ट्रवादीभोवती निकालाचे पारडे
राष्ट्रवादी-काँग्रेसने उमेदवार न देता या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. महापालिकेतील सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पोटनिवडणुकीत भाजपला छुपा सपोर्ट करणार की महाविकास आघाडीचा धर्म पाळणार याची उत्सुकता नगरकरांना आहे. आमदार संग्राम जगताप सांगतील तो आदेश मान्य करण्याची भूमिका आघाडीच्या नगरसेवकांनी घेतल्याने आमदारांच्या भूमिकेवरच निवडणूक निकालाचे पारडे फिरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अर्जासोबत जोडले कास्ट सर्टीफिकेट
अनुसुचित जमाती महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. वर्षभरात जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) सादर करणे विजयी उमेदवाराला बंधनकारक असते. याच प्रमाणपत्राअभावी सारीका भूतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यामुळे सेना आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्राची पावती न लावता थेट प्रमाणपत्रच सादर केले.

Post a Comment