शहर स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा सहभाग महत्वाचा - नगरसेविका सोनाली चितळे
विद्यार्थ्यांना दिली स्वच्छतेची व प्लॅस्टिक मुक्तीची शपथ
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - संत गाडगेबाबा यांच्यापासून आपल्या देशामध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती मोहिम सुरूवात होवूनही आजही स्वच्छते संदर्भात आपल्याला समाजामध्ये जनजागृती करावी लागते. त्यानंतर आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी हगणदारी मुक्त गांव योजना यशस्वी करून दाखविली. आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छतेच्या मोहिमेची चळवळ पुन्हा सुरू केली. प्रत्येक नागरिकांने स्वच्छता संदर्भात जागृती ठेवून आपला परिसर स्वच्छ ठेवावा यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे. परंतु नागरिकांचा सहभाग मिळत नाही तो प्रत्येकाने द्यावा असे आवाहन नगरसेविका सौ.सोनालीताई चितळे यांनी केले.
प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपाच्या नगरसेविका सौ.सोनालीताई चितळे यांनी सांगळे गल्ली येथील समर्थ विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वच्छतेच व प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली. यावेळी नगरसेविका सौ.सुवर्णा गेणाप्पा, मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा तळेगांवकर,सौ.वसुधा जोशी,सौ.श्रुती कुलकर्णी , सौ.श्रध्दा नागरगोजे सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
नगरसेविका सौ.सोनालीताई चितळे पुढे म्हणाल्या की, शासनाची स्वच्छतेची व प्लॅस्टिक मुक्तीची योजना यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची चळवळ व्यापक व्हावी यासाठी प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना स्वच्छता व प्लॅस्टिक मुक्तीबाबत शपथ देवून विद्यार्थ्या मार्फत त्यांच्या पालकांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करावी आजचा विद्यार्थी हा उदयाचा भारताचा कर्तव्यदक्ष नागरिक बनणार आहे. भारत देश महासत्तेकडे विद्यार्थ्यांच्या जोरावर झेप घेत आहे. यासाठी कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. मनपा मार्फत स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आलेली असून त्यात ब-याच नागरिकांचा सहभाग मिळत आहे. त्यामुळे नगर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. याच धर्तीवर शहर कायम स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी राहून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे कर्तव्य बजवावे व शहराला कायम स्वरूपी कचरामुक्त होण्यासाठी मदत करावी असे आवाहन सौ.सोनालीताई चितळे यांनी केले.

Post a Comment