मनसेचे रिलॉचिंग ; 'राज'पुत्र अमित ठाकरेंची नेतेपदी निवड


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: मनसेच्या महाअधिवेशनात अखेर आज मोठी घोषणा झाली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. सर्व मनसैनिकांच्या संमतीनं अमित ठाकरे यांच्या नावाचा ठराव पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

मनसेच्या महाअधिवेशनात अखेर अमित ठाकरे यांचं लाँचिंग झालं. अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड केल्याची घोषणा पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर अमित यांचे शाल आणि तलवार देऊन स्वागत केलं. अमित ठाकरे यांना संपूर्ण ठाकरे कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाच्या नेतेपदी अमित यांच्या नावाची घोषणा होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मुलाची म्हणजेच अमित यांची मोबाइल कॅमेऱ्यात छबी टिपली. यावेळी त्यांच्यासह अमित यांची पत्नी मिताली आणि बहीण उर्वशी या देखील भावूक झाल्या होत्या.

अमित व्यासपीठावर येताच महाअधिवेशनात उपस्थित मनसैनिकांनी प्रचंड जल्लोष केला. 'काल संध्याकाळपर्यंत मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. संध्याकाळी उशिरा मला राज साहेबांनी सांगितलं. शिक्षणाचा ठराव मांडायचे असल्याचे समजले तेव्हा माझ्या पायाखालची वाळू सरकली,' असं अमित ठाकरे म्हणाले. यावेळी अमित यांनी शिक्षणाचा ठराव मांडला.

दरम्यान, अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृतरित्या एन्ट्री झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येईल याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. अमित यांच्याकडे भविष्यात कोणती जबाबदारी दिली जाईल, याची माहिती महाअधिवेशनात देण्यात आली. मनसेतर्फे भविष्यात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होईल, अशी माहिती मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post