महापालिकेच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राज्यात सत्ता स्थापन करताना एकत्र आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नगर महापालिकेच्या प्रभाग 6 अ च्या एका रिक्त जागेच्या पोट निवडणुकीतही राबविण्यात येणार असून ही जागा शिवसेनेला सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरला नाही. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत महाआघाडीतील शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती एकत्रित निवडणूक लढली मात्र सत्ता स्थापन करतेवेळी युतीत काडीमोड होवून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली आणि त्यांनी सत्ता काबीज केली. महाविकास आघाडीचे हे वारे राज्यभरात वाहू लागले आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीतही जिल्हयात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कायम राहिला आहे. आता 6 फेब्रुवारी होत असलेल्या महापालिकेच्या प्रभाग 6 अ च्या एका रिक्त जागेच्या पोट निवडणुकीतही हाच फॉर्म्युला राबविण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे महाआघाडीविरुद्ध भाजपा अशी लढत रंगणार आहे.

महापालिकेच्या डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून तर शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी शिवसेनेच्या सारिका हनुमंत भूतकर या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे नगरसेवक पद जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केले होते. त्यामुळेच या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

महाआघाडीमुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नाही – आ.संग्राम जगताप
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. पण आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी झालेली आहे. या प्रभागात शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला होता. त्यामुळे महाआघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.

पक्षनेत्यांच्या आदेशानुसार जागा शिवसेनेला सोडली : दीप चव्हाण
पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे 2 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. मात्र राज्यपातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाआघाडी असल्याने आणि प्रभाग 6 अ जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला होता. त्यामुळे या जागेवर त्यांचा प्रथम हक्क आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही जागा शिवसेनेला सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही ही जागा शिवसेनेसाठी सोडत असल्याचे काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post