विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाची गरज - महापौर बाबासाहेब वाकळे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक उपक्रमाची माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य शिक्षण व प्रात्यक्षिकांच्या अनुभवाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करुन पुढील वाटचाल करावी. प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनामध्ये विविध स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. शालेय शिक्षण घेत असताना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शिक्षणाबरोबर धार्मिक, ऐतिहासिक व आपल्या संस्कतीची व परंपरेची ओळख निर्माण व्हावी यासाठी शिक्षण दिले पाहिजे. सर्वांगीण शिक्षणाचे काम महाराष्ट्र पब्लिक स्कूल व ज्युनइर कॉलेज करत आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

सावेडी येथे महाराष्ट्र पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे, संस्थापक प्राचार्य अंकुश दराडे, ऍड. युवराज पोटे, राजेंद्र चोभे, स्वाती दराडे, अरुण पालवे, अमिता गुलाटी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सतिश सोनवणे म्हणाले की, शिक्षणाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले पाहिजे. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला व्यासपीठ निर्माण होते. आई-वडीलांनी मुलांच्या आवडीच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबर सामाजिक गुणांच्या मुल्यमापनाबरोबर त्याच्या संघटन कौशल्याचा विकास व्हावा, आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा सक्षम नागरिक आहे, असे ते म्हणाले.

प्राचार्य अंकुश दराडे म्हणाले की, महाराष्ट्र तांत्रिक मंडळ शिक्षण क्षेत्रामध्ये राज्यभर काम करत आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर कौशल्य शिक्षणाची जोड दिली आहे. तसेच वर्षभर सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जातात. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला इंग‘जी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी आमची संस्था काम करत आहे. इंग‘जी शिक्षणाबरोबर मराठीची नाळ जोडण्याचे काम आमची संस्था करीत आहे.

सण, उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती साजरी करुन आपली संस्कृती व आपला इतिहास आजच्या पिढीला कळावा यासाठी आम्ही काम करत आहे.लवकरच आमची संस्था स्पर्धा परीक्षा कॅम्प सुरू करणार आहे व खेळासाठी अत्याधुनिक खेळाचे मैदान सुरू करणार आहे.संस्थेच्यावतीने महिलांना विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. यावेळी विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुशांत सामलेटी, सूत्रसंचलन धनश्री पेहेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य अमिता गुलाटी यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post