‘स्वीकृत’साठी सर्वच पक्षात फिल्डिंग




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळावी, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील कार्यकर्त्यांची रस्सीखेच सुरू आहे. तीनही पक्षाकडून जी नावे येत आहेत, त्यातील बहुतांश महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांचीच गर्दी जास्त आहे. निवडीसाठी मोठी उलाढाल होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीची सभा घेण्यासाठी तब्बल वर्षभरानंतर मूहूर्त लागला. त्यामुळे आता निवड होणार्‍या सदस्यांना केवळ चार वर्षांचा कालावधी मिळणार आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी नियुक्ती करताना समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्‍यांचा विचार करणे आवश्यक असावे, असे अधिनियमात म्हटले आहे. त्यामध्ये शिक्षण, वैद्यकीय, कला, सामाजिक अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांच्या क्षेत्रातील अडचणी सभेसमोर येऊन शहरात त्या दृष्टीने उपाययोजना करणे सोयीचे व्हावे, त्या क्षेतातील तज्ज्ञ महापालिका सभागृहात असावेत, असा त्यामागील हेतू आहे.



मात्र यापूर्वी अपवाद वगळता फार कमी लोकांना अशी संधी मिळाली आहे. प्रत्येकवेळी राजकीय सोय पाहूनच निर्णय घेतले जातात. त्या पार्श्वभूमीवर यावेळी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी यातील नियमावली तपासण्यास सुरूवात केल्याचे समजते. नियमावलीनुसार उमेदवार असावेत, असा त्यांचा दंडक असेल. तसे झाल्यास राजकीय पक्षांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मात्र यात ते किती यशस्वी ठरतात, याबाबत साशंकता आहे.

महापालिकेतील पक्षीय बलावल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक असे पाच स्वीकृत सदस्य नियुक्त होऊ शकतात. त्यात शिवसेनेमध्ये विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीनंतर नेते आणि नगरसेवक यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. नेत्यांपासून दूर गेलेल्यामध्ये गटनेतेही आहेत. या निवडणुकीत गटनेत्यांची भूमिक अत्यंत महत्त्वाची असते.

शिवसेनेतील या दुराव्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. आगामी महापौरपदाच्या निवडीत संधी मिळावी म्हणून शिवसेनेचे गटनेते प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीच्या सहकार्याशिवाय त्यांना संधी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी स्वीकृतच्या निवडीत घेऊ शकते. किमान त्यांना शिवसेनेतील नको असलेला उमेदवार टाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

या पक्षाकडून महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर आकाश कातोरे यांच्यासह हर्षवर्धन कोतकर यांची नावे चर्चेत आहेत. स्थानिक पातळीवर यावर निर्णय होण्याची शक्यता नसल्याने हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेले आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत संपर्कनेते भाऊ कोरगावकर यांच्याकडून बंद पाकीटात नावे येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीमध्ये पराभूत झालेले आरिफ शेख यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, बाबा गाडळकर, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, दगडू मामा पवार यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीतील नाव ठरविण्याचे पुर्णाधिकार आ. अरूण जगताप आणि आ. संग्राम जगताप या पितापुत्रांना आहेत. ते ठरवतील त्यांनाच संधी मिळू शकते. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ही फक्त चर्चेतील नावे आहेत. चर्चेत नसलेली परंतु गोपनिय फिल्डिंग लावलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे चर्चेतील नावांपेक्षा वेगळी नावे आल्यास आश्चर्य वाटायला नको.

भाजपमध्ये रस्सीखेच
भाजपकडून पराभूत झालेले किशोर डागवाले, किशोर बोरा, रामदास सांगळे यांच्यासह राहुल वाकळे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये दोन गट असले, तरी माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅॅड. अभय आगरकर या प्रक्रियेत सध्यातरी अलिप्त आहेत. संघटनेत काम करणार्‍यांना संधी मिळायला हवी, अशा मतांचे भाजपमध्ये काहीजण आहेत. जे निवडून येऊ शकत नाहीत, परंतु संघटनेसाठी सतत कार्यरत असतात, अशांचा विचार व्हावा असे काहींचे मत आहे. मात्र पराभूत झालेल्यांचे पूनर्वसन करण्याकडेच अधिक कल असल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. या मताचा विचार होतो का शहरजिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी घेतील तोच निर्णय अंतिम राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post