माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : सीमेवर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या कारणामुळे सशस्त्र दलाच्या जवानांना तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून जवानांनी तात्काळ कोटयातून घेतलेल्या रेल्वे तिकिटांना पुष्टी मिळत नसल्याने हे जवान सीमेवर हजर होउ शकत नाहीत. जवान तसेच त्यांच्या परिवारांनी तात्काळ कोटयातून घेतलेल्या तिकीटांना तात्काळ पुष्टी देण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
दोन्ही मंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सीमेवरील संवेदनशील परिस्थितीचा विचार करता भारतीय सेना, नौसेना व वायुसेनेच्या जवानांना अल्प सुचननेवरून कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीमा भागात राहणाऱ्या जवान व त्यांच्या परिवारांना स्थानिक प्रशासन आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचेही निर्देश दिले आहेत. कर्तव्यावर हजर होण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी तात्काळ कोटयातून नोंदविण्यात आलेली रेल्वे तिकीटांची पुष्टी होत नाही. त्यामुळे जवान व त्यांच्या परिवाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
खा. लंके यांनी निवेदनात पुढे नमुद केले आहे की, जवान व त्यांच्या परिवाराच्या समस्यांचे संकलन करून आपण आवश्यक त्या कागदपत्रांसह रेल्वे विभागाकडे पाठवत आहोत. जवानांना सीमेवर हजर होण्यासंदर्भातील आदेश तसेच अधिकृत ओळखपत्रांसह पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना प्राथमिकता देउन त्या-त्या तिकीटांना पुष्टी देण्याची मागणी खा. लंके यांनी गृहमंत्री तसेच रेल्वेमंत्रयांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
रेल्वेच्या विविध विभागांनाही निवेदन
रेल्वेच्या पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई तसेच भुसावळ येथील विभागांनाही खा. लंके यांनी तात्काळ कोट्यातील जवानांच्या तिकीटांना पुष्टी देण्यासंदर्भात निवेदन पाठविले आहे. खा. लंके यांच्याकडे संकलीत झालेल्या जवनांच्या तिकीट पुष्टीकरणाबाबतचे प्रस्ताव आवष्यक त्या कागदपत्रांसह सबंधित विभागांकडे खा. लंके यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात येत आहेत.
जवानांनी संपर्क करण्याचे आवाहन
खासदार नीलेश लंके यांनी तात्काळ कोट्यातील रेल्वे तिकीट पुष्टीकरणासंदर्भात अडचणी येत असतील तर संपर्क करण्याचे आवाहन जवानांना केले होते. त्यानंतर अनेक जवानांनी खा. लंके यांच्या कार्यालयाकडे त्यांचे प्रस्ताव पाठविले आहेत. हे प्रस्ताव रेल्वेच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात येत आहेत. जवान व त्यांच्या परिवाराला मदत करण्यासाठी खा. लंके यांनी नवी दिल्ली, अहिल्यानगर व पारनेर येथे स्वतंत्र मदत कक्ष सुरू केले असून तेथून जवानांच्या तात्काळ तिकीटांचे पुष्टीकरण करून देण्यात येत आहे. जवान व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शिवाजी कराळे : ८३९०६६३३३३, संदीप चौधरी ९७०२४३६०८७, सचिन टकले : ९७६६९२०३२६, गोरख कंदलकर : ८९९९५२५०१६ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment