केडगावच्या समस्या सोडवा, अन्यथा मनपासमोर आमरण उपोषण ; केडगावकरांचा इशारा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केडगाव भूषणनगर येथील मुलभूत नागरी समस्या सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून, या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त, महापौर तसेच खासदारांना देण्यात आले. तर तातडीने ड्रेनेज, पाणी व रस्त्याचे प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा महापालिके समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

भूषणनगर भागातील ड्रेनेज लाईन जीर्ण झाली असून, जागोजागी तुटली आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर येत असून, दुर्गंधी व घाणीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात लहान मुलांसह नागरिक साथीच्या आजारांनी त्रस्त आहे. पिण्याचे पाईपलाइन देखील अत्यंत जुनी झाली असून, अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. या भागातील काही ठिकाणी नागरिकांना पाणी देखील मिळत नाही. तसेच येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली असून, भूषणनगर मधील अंतर्गत रस्ते पुर्णत: खराब झाले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने भूषणनगर येथे ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन टाकून, अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अनिल हांडोरे, देवडे सर, प्रवीण खाडे, राजेंद्र भोर, तुषार धस, अर्जुन ठाणगे, योगेश पाथरकर,सत्रे, चंगेडिया यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post