‘के.के. रेंज’प्रश्‍नी संरक्षणमंत्र्यांची भेट घेवून तोडगा काढणार – खा.शरद पवार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – लष्कराच्या के.के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारास आसपासच्या 23 गावातील नागरिकांचा असलेला विरोध पाहता याप्रश्‍नी लवकरच केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेट घेवून तोडगा काढण्यात येईल. नागरिकांनी याबाबत अजिबात चिंता करू नये, असे आश्‍वासन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती आ. निलेश लंके यांनी दिली.

पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील एकूण 23 गावांच्या हद्दीत होत असलेल्या के.के. रेंजचा विस्तार थांबवण्याच्या मागणीसंदर्भात आ.लंके यांनी बुधवारी (दि. 22) मुंबईत खा. शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी पणन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोकराव सावंत, अॅड. राहुल झावरे, लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब शिर्के आदी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना खा. पवार यांनी आपण या प्रश्‍नांत लक्ष घालून हा तिढा सोडवू, असे आश्‍वासन दिले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

नगरजवळील लष्कराच्या के.के. रेंज या युद्ध परीक्षण व सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणाच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचणी सुरू आहे. के.के. रेंज संदर्भात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील संबंधित गावांमधील अनेक लोकांनी यासंदर्भात आमदार लंके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आ. लंके यांनी जनतेच्या मनात के.के. रेंज विस्ताराविषयी मोठ्या प्रमाणात भीती असून, येथील ग्रामस्थ वेळोवेळी उग्र आंदोलनाच्या तयारीत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयाने के.के. रेंज विस्तार थांबविण्यासाठी सरकारीपातळीवर प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याकडे त्याचा पाठपुरावा करावा; तसेच 23 गावांतील लोकांची होणारी गैरसोय टाळावी, असे निवेदन आ. निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना शनिवारी (दि.18) दिले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.21) राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्यासमवेत संबंधित गावांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी हजारे यांनी मौन आंदोलन संपल्यावर संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

विस्तारामुळे 23 गावांमधील जनजीवन विस्कळीत होणार
के.के. रेंज विस्तार धोरणामुळे 23 गावांमधील जनजीवन विस्कळीत होत आहे. या गावांमध्ये राहणारे बहुसंख्य लोक आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी, कष्टकरी आहेत. या गावातील लोकांना वित्तसंस्था व बँकांच्या विस्ताराचे कारण दाखवत कर्जपुरवठा करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तास येथील आदिवासी लोकांना सरकारी नियमानुसार वनजमिनींचे वाटप होत होते. मात्र, आता रेंज विस्तारीकरणाचे कारण देऊन महसूल खात्याने वाटप थांबविले आहे. या गावातील जमिनी बिगरशेती (एनए) होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. के. के. रेंज विस्तार धोरणामुळे या हद्दीत राहणार्‍या लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असल्याचे आमदार लंके यांनी खा. पवार यांना बुधवारी (दि.22) मुंबई भेटीत सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post