केडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहराजवळ बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले असून, केडगाव देवी मंदिर ते रेल्वे मार्ग या भागात गुरुवारी (दि.16) रात्री व शुक्रवारी (दि.17) सकाळी वेगवेगळ्या नागरिकांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केडगाव देवी मंदिरापासून दौंड रोडकडे जाणार्‍या रस्त्याने जात असलेले माजी नगरसेवक सुनील कोतकर यांना गुरुवारी (दि.16) रात्री 8.30 वा.च्या सुमारास बिबट्या दिसला. ते दुचाकीहून जात असताना बिबट्या त्यांना आडवा गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी याची कल्पना वन विभागाला दिली. वन विभागाच्या पथकाने रात्री या भागात गस्त घातली मात्र त्यांना बिबट्या आढळला नाही. दरम्यान शुक्रवारी (दि.17) सकाळी 9 वा.च्या सुमारास ठुबे व गायकवाड हे शेतकरी शेतात गवत आणण्यासाठी गेले असता ऊसाच्या शेतात त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे ते भयभित होवून तेथून लोकवस्तीत आले. याबाबतची माहिती त्यांनी नगरसेवक मनोज कोतकर यांना दिल्यानंतर त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक आर.जी.देवखिळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. देवखिळे यांनी तातडीने वन विभागाचे पथक या परिसरात पाठविले. या पथकाकडून दुपारी उशिरापर्यंत बिबट्याचे ठसे शोधण्याचे काम सुरु होते. बिबट्याचे ठसे आढळल्यास त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे देवखिळे यांनी सांगितले.

दरम्यान शहराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने केडगाव देवी मंदिर परिसर, शास्त्रीनगर भागात चांगलीच घबराट पसरली आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने शोध घेवून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post