देशव्यापी संपात जिल्ह्यातील सर्व कष्टकरी, कामगार, कर्मचारी संघटनांचा सहभाग


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, कामगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील, महानगरपालिका कर्मचारी, हमाल-माथाडी तसेच देशपातळीवरील सर्व क्षेत्रातील कर्मचारी विरोधी निर्णय सातत्याने घेत असून, त्याचे न्याय व रास्त अधिकार हिरावून घेत आहेत. या अन्यायाच्या विरोधात आज आज विविध संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चात हमाल पंचायत संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कर्मचारी संघटनेचे रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, शिक्षक संघटनेचे अप्पासाहेब शिंदे, मनपाचे अनंत लोखंडे, अ‍ॅड.सुभाष लांडे, बाबा आरगडे, शंकर न्यालपेल्ली आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना अविनाश घुले म्हणाले, गेल्या 5 वर्षात भाजपाच्या शासनाने सातत्याने कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या विरोधात धोरणे घेऊन त्यांच्या हितावर घात घालण्याचे काम केले आहे. कायदा दुरुस्तीच्या नावाखाली अन्यायकारक विविध बंधने लादण्यात आली आहेत. रेशन, पेन्शन, बाजार समिती बरखास्ती सारखे निर्णय घेऊन एकंदरीतच हक्क हिरावून घेण्याचे काम शासनाच्यावतीने सुरु आहे. तरी सध्याच्या शासनाने त्वरित निर्णय घेऊन कष्टकर्‍याना न्याय मिळवून द्यावा तसेच शासनाने तात्काळ जाचक अटी नियम घालून बदल केलेला माथाडी कायदा जैसे थे ठेऊन रेशन व पेन्शन लागू करून घरकुले देऊन कामगारांचे हित जपावे, अशी मागणी यावेळी श्री. घुले यांनी यावेळी केली.

यावेळी अनंत लोखंडे म्हणाले, राज्यात सुमारे 2 लाख सरकारी पदे रिक्त असून, या पदांचा अतिरिक्त कारभार कार्यरत कर्मचार्‍यांना सांभाळावा लागत आहे. याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम कर्मचार्‍यांना भोगावे लागत आहे. याकरीता सर्व विभागातील पदे तातडीने भरावीत, अनुकंपानुसार नियुक्तीसाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन त्यांना शासकीय सेवेत त्वरित नियुक्त्या द्याव्यात, जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्‍यांना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी गोविंद सांगळे, शेख रज्जाक, मधुकर केकाण, बाळासाहेब वडागळे, लक्ष्मीबाई कानडे, भैरु कोतकर, विष्णू म्हस्के आदि.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post