'वाळू' तडजोड व गांजा प्रकरणात 'कोतवाली'च्या चौघांवर संक्रांत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्यानंतर चालकाकडून पैसे घेऊन सोडून दिल्याचा आरोप असणारे आणि गांजा प्रकरणातील अटक केलेला आरोपी पसार झाल्या प्रकरणी चौघां जणांवर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुरूवारी निलंबनाची कारवाई केली. प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव, किरण बारवकर यांचे निलंबन करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत, अशी माहिती कोतवालीचे निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले. चौघांवर कारवाई झाल्याने कोतवाली पोलिसांना धक्काच बसला आहे. संक्रातीच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई झाल्याने चौघांवर संक्रात आली असल्याचे बोलले जात आहे.

शहर पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतूक करणारे दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यातील एक आरोपी जिल्हा रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केला होता. तो पोलीस बारवकर यांच्या ताब्यातून पसार झाला. तसेच अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर कोतवालीच्या प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव यांनी पकडला होता. तो डंपर पैसे घेवून सोडून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या दोन्ही प्रकरणाची प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या दोन्ही प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यानुसार या कर्मचार्‍यांचे गुरुवारी रात्री उशिरा निलंबनाबाबत आदेश दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post