जेऊरमधुन दुचाकी चोरणारा भामटा गजाआड


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील जेऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर लावलेली मोटार सायकल चोरुन नेणा-यास एम.आय.डी.सी.पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी कि, जेऊर येथील महाराष्ट्र बँकेसमोर लावलेली शाईन मोटार सायकल अज्ञात चोरांनी चोरून नेली होती. याप्रकरणी संजय मल्हारराव लांडे ( वय ४२ रा. बोलेगाव फाटा, नगर) यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३९/२०२० भा.द.वि. कलम ३७९ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

जेऊर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतच्या कॅमे-‍यामध्ये चोरी करणारा कैद झाला होता. सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे मोठ्या शिताफीने तपास करत एम.आय.डी.सी. पोलीसांनी २४ तासाच्या आत आरोपी विकी जाधव( रा. बहिरवाडी ता.नगर) यास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात आली.

यापूर्वी जेऊर परिसरातून अनेक मोटरसायकलची चोरी झाली असून अधिक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी, पो. ना. कावरे, पी.सी कवाष्टे, पंधरकर यांच्या पथकाने सदर कारवाई केली. चोवीस तासाच्या आत गुन्ह्याची उकल करुन आरोपी अटक केल्याने जेऊर ग्रामस्थांच्या वतीने एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे कौतुक करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post