नागरिकत्व दुरुस्ती कायदा ; कन्हैया कुमारच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली


माय अहमदनगर वेब टीम
हैदराबाद : नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी आणि एनपीआर यांच्याविरोधात हैदराबादमध्ये आयोजित केलेली सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला रद्द करावी लागली आहे. या सभेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार संबोधित करणार होता. मात्र, पोलिसांनी या सभेला परवानगी दिली नाही. दरम्यान, पोलिसांच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं.

नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि एनपीआरविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या कायद्याविरोधात हैदराबादमधील मेहदीपट्टणम येथील क्रिस्टल गार्डनमध्ये सभा होणार होती. मात्र, ऐनवेळी ही सभा रद्द करावी लागली. या सभेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार संबोधित करणार होता. मात्र, पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली. सभेला परवानगी नाकारल्याची सूचना पोलिसांनी पक्षाला दिली नाही. परंतु, ज्या ठिकाणी सभा होणार होती, तेथील व्यवस्थापनाला सभेसाठी तयारी न करण्याचे आदेश देण्यात आले. हैदराबादचे पक्षाचे सचिव ई. टी. नरसिंहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या सभेला पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. नारायण, माजी खासदार सैयद अझीझ पाशा आणि कन्हैया कुमार संबोधिक करणार होता. अझीझ पाशा यांनी सार्वजनिक सभेला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांवर टीका केली आहे. पोलीस अधिकारी राज्य सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. शांततेनं होणाऱ्या जाहीर सभांना परवानगी नाकारून लोकशाही अधिकारांवर गदा आणण्याचं काम केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.गेल्या महिन्यातही विरोधात होणाऱ्या पक्षाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याआधी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसलाही नागरिकत्व कायद्याविरोधातील रॅलीला परवानगी दिली नव्हती. त्यानंतर हैदराबाद पोलीस आयुक्तांविरोधात राज्यपालांकडे तक्रारही करण्यात आली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post