बेनामी संपत्ती आढळल्याप्रकरणी वनसंरक्षकावर गुन्हा दाखल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महाराष्ट्र शासनाच्या सेवा कालावधीत उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता (अपसंपदा) प्राप्त केल्या प्रकरणी सहायक वनसंरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरुवार (दि.23) सकाळी करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, केशव रभाजी फंड (वय 56, साहायक वनसंरक्षक वर्ग – 1, रा.सुपा, ता.पारनेर) हे महाराष्ट्र शासन सेवेत साहायक लागवड अधिकारी म्हणून 1984 मध्ये रुजू झाले. त्यांनी त्यांच्या सेवाकालावधीमध्ये 1984 ते 2014 या कालावधीत त्यांचे सर्व ज्ञात कायदेशीर उत्पन्नातून मिळवलेली एकूण मालमत्ता व त्यांच्या कालावधीतील त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा एकूण खर्च यांचा तौलानिक अभ्यास केला असता त्यांनी सन 2000 मध्ये 24 टक्के, सन 2003 मध्ये 4 टक्के, सन 2005 मध्ये 55 टक्के इतकी उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता (अपसंपदा) प्राप्त केली असल्याचे मालमत्तेच्या चौकशीत निष्पन्न झाले. तसेच ही मालमत्ता अपसंपदा प्राप्त करण्याकरीता केशव फंड यांची पत्नी सविता केशव फंड (वय 50) यांनी प्रोत्साहन दिले, असे निष्पन्न झाले.




यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुपा पोलीस ठाण्यात केशव फंड व सविता फंड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक करांडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अ.नगर) हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post