राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा अहमदनगरला होणे ही अभिमानास्पद बाब - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगरला राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे या स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत. शानदार सोहळ्यात या स्पर्धेचे उद्घाटनही झाले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पर्धा उद्घाटनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना केले.

क्रीडा व युवा सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 जानेवारीपर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन वाडिया पार्क मैदानावर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व मशाल प्रज्वलीत करुन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपमहापौर मालन ढोणे, स्कूल गेम फेडरेशनचे संचालक अजय मिश्रा, बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, क्रीडा अधिकारी व स्पर्धा संयोजक कविता नावंदे, स्पर्धेचे चीफ रेफरी नरेंद्र नावर्देकर, राष्ट्रीय खेळाडू मिलिंद कुलकर्णी, आयलव्ह नगरचे प्रतिनिधी संदिप जोशी, जागरुक नागरीक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, सामाजिक कार्यकर्ते धनेश बोगावत, रावसाहेब घाडगे, महिला बाल कल्याण सभापती लता शेळके, नगरसेवक रविंद्र बारस्कर आदिंसह देशातून आलेल्या 65 राज्यांचे कोच व जवळपास 600 खेळाडू, संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा नगरमध्ये झाल्याने शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होणार असल्याने खेळाडूंनी प्राविण्य दाखवून आपआपल्या राज्याचे नाव उंचवावे.

यावेळी प्रास्तविकात अजय मिश्रा यांनी स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती दिली. आभार मानतांना स्पर्धा संयोजिका कविता नावंदे म्हणाल्या, सर्वांनी केलेल्या बहुमोल सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विशेष लक्ष या स्पर्धेकडे दिले आहे. सर्व खेळाडूंची उत्तम व्यवस्थाकरण्याबरोबरच स्पर्धा निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

यावेळी नृत्य झंकार अ‍ॅकॅडमी व सावरा डान्स ग्रुपने महाराष्ट्राची परंपरा असलेले नृत्य व राजस्थानी लोकनृत्य सादर केले. उद्घाटनानंतर सर्व खेळाडूंचा मार्चपास झाला. वाडिया पार्कयेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झालेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये सर्व स्पर्धा होत असून, दि. 7 पर्यंत सकाळी 9 वा.या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post