'वाडा'चा दणका; ४ वर्षे रशियाचा 'खेळ खल्लास'!
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने क्रीडाविश्व हादरलं आहे. या बंदीमुळे पुढील चार वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून रशिया बाद झाला आहे. परिणाणी २०२० मध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आणि २०२२ मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपला रशियाला मुकावे लागणार आहे.
डोपिंगबाबत एका लॅबमधून चुकीचा तपशील देण्यात आल्याने त्याची गंभीर दखल घेत 'वाडा'ने रशियावर चार वर्षे बंदी घालण्याचे कठोर पाऊल उचलले आहे. याबाबत 'वाडा'च्या प्रवक्त्याने तपशीलवार माहिती दिली. ज्या शिफारशी करण्यात आल्या होत्या त्या सर्वसमंतीने स्वीकारण्यात आल्या आहेत, असे 'वाडा'ने स्पष्ट केले. 'वाडा'च्या कार्यकारी समितीची बैठक स्वित्झर्लंड येथे पार पडली. या बैठकीत रशियावर चार वर्षे बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
रशियावर चार वर्षे बंदी घालण्यात आली असली तरी डोपिंग चाचणीत ज्या रशियन खेळाडूंना क्लीन चिट मिळेल ते खेळाडू तटस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 'वाडा'ने घेतलेल्या निर्णयास रशिया पुढील २१ दिवसांच्या आत आव्हान देऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे. रशियाने या निर्णयास आव्हान दिल्यास या प्रकरणावर स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे 'वाडा'ने संपूर्ण विचारांती रशियाविरुद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. वाडाच्या उपाध्यक्षा लिंडा हेलेलँड यांनी तर रशियावर घालण्यात आलेली बंदी पुरेशी नाही, असे म्हटले आहे.
Post a Comment