नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध, मंगळुरूत पोलिस गोळीबारात 2, लखनऊत एकाचा मृत्यू, 6 भाजपशासित राज्यांसह 11 राज्यांत निदर्शने



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली/लखनऊ/ पाटणा - नागरिकत्व कायद्याविरुद्ध गुरुवारी ११ राज्यांत आंदोलन पेटले. डावे पक्ष व मुस्लिम संघटनांनी केलेल्या भारत बंददरम्यान बहुतांश ठिकाणी शांततेत निदर्शने झाली. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि कर्नाटकात हिंसाचार, जाळपोळ झाली. लखनऊत कट्ट्यातून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यादरम्यान, एकाचा मृत्यू झाला. वाराणसीतही तुफान दगडफेक झाली. दिल्लीच्या बहुतांश भागांत इंटरनेट, एसएमएस व कॉलिंग ४ तास बंद होती.

कर्नाटकातील मंगळुरूत पोलिस गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटली असल्याचे ते म्हणाले.

कायदा आजपासून गुजरातेत लागू, ३५०० हिंदूंना मिळणार नागरिकत्व

गांधीनगर : नागरिकत्व कायद्याचा लाभ शुक्रवारपासून निर्वासितांना होऊ शकेल. यानुसार गुजरातमध्ये गांधीधाम-कच्छमध्ये पाकमधून आलेल्या ३,५०० हिंदूंना नागरिकत्व दिले जाईल.


६ भाजपशासित राज्यांसह ११ राज्यांत निदर्शने

- उत्तर प्रदेश : निदर्शकांनी १० कार, २३ दुचाकी, तीन बस आणि ४ ओबी व्हॅन पेटवल्या. दोन पोलिस ठाणीही पेटवली. १४४ कलम लागू.
- दिल्लीत कोंडी : दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर १० किमी अंतरात वाहने अडकून राहिली. क्रू सदस्य अडकल्याने १० उड्डाणे रद्द. मोबाइल इंटरनेट बंद राहिले.
- प. बंगाल : कायदा लागू करण्यास ममता बॅनर्जी यांचा नकार.
- तामिळनाडू : श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांची निदर्शने.
- ईशान्य : आसाम, मेघालयात शांततेने निदर्शने.
- जम्मू-काश्मीर : युवा काँग्रेस नेते अटकेत. पोलिसांविरुद्ध पत्रकारांची निदर्शने.
- बिहार : अनेक रेल्वे रद्द, हायवेवर कोंडी. राज्यात अनेक ठिकाणी तोडफोड.
- कर्नाटक : मंगळुरूत संचारबंदी, लाठीमार. इतिहासकार रामचंद्र गुहांसह २० ताब्यात.
- गुजरात : अहमदाबादेत दगडफेक, २० हून अधिक पोलिस जखमी.
- तेलंगणा : ५० लोक ताब्यात, अनेक ठिकाणी दगडफेक, लाठीमार.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर

- मुंबई : ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन.बॉलीवूड कलाकारांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.
- पुणे : अनेक ठिकाणी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध दशर्वत निदर्शने केली. कायद्याच्या समर्थनार्थही निदर्शने झाली.
- नागपूरमध्ये भारतीय मुस्लिम परिषद तसेच जमाते इस्लामी हिंद या संघटनांनी मोर्चा काढून निषेध केला. तसेच अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती आणि विदर्भातील अनेक शहरांमध्येही जोरदार निदर्शने करण्यात आली. जळगाव महापालिकेच्या सभेत गुरुवारी पडसाद उमटले. भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे स्वागत केल्याने शिवसेना नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी महापाैरांसमाेरील राजदंड पळवला.
- सोलापूर शहरात सकाळपासून अनेक संघटना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कायद्याविरोधात निदर्शने केली.
- नगरमध्ये शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी तगडा बंदोबस्त होता.
- सातारा शहरात मुख्य चौकातून मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात आली.
- नाशिक तसेच मनमाडमध्येही अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post