कांद्याने आणले अनेकांना ‘अच्छे दिन’
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कांदा सफरचंद आणि हापूस आंब्याच्या भावात विकला जात आहे. त्यामुळे रग्गड पैसा मिळत असल्याने अनेक कांदा उत्पादकांच्या जिवनात ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र लिंबाचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
सध्या सामान्यांच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले आहेत. एकिकडे वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना जेवणातून कांदा कपात करावी लागत आहे. तर हॉटेेलातून कांदा गायब झाला आहे. दुसरीकडे कांद्याला सफरचंदापेक्षा जास्त भाव आला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या भावात जोरदार वाढ होत आहे. नगर, श्रीरामपुरात कांद्याला क्विंटलमागे 10 हजारांचा भाव मिळाला. त्यानंतर घोडेगावात 13700 चा भाव मिळाला.
मंगळवारी झालेल्या लिलावात संगमनेरात 17100, राहुरी 15500, कोपरगावात 13700 रूपयांचा दर मिळाला. बुधवारी श्रीरामपुरात 14000 चा भाव मिळाला. लाल कांद्यालाही प्रथमच मोठा भाव मिळत आहे. ज्यांच्याकडे जुना कांदा बर्यापैकी होता. त्यांना याच कांद्याने लखोपती केले. अनेकांच्या पट्ट्या लाख, 2 लाख, 5 लाख, 7 लाख, 8 लाख अशा निघाल्या आहेत. नेवाशाच्या शिरसगावातील सोनाली लंघे यांना 125 गोणी कांद्याचे 8 लाख 33 हजार रूपये मिळाले. आयुष्यात कधी नव्हे एवढे पैसे कांद्याने दिल्याने काही शेतकर्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर काहींच्या मुलींच्या लग्नाची काळजी मिटली म्हणत बँकांमध्ये एफडीत पैसे गुंतवले आहेत.
एकीकडे कांद्यामुळे शेतकरी मालामाल होत असतानाच, दुसरीकडे लिंबाचे भाव 30 रूपयांवरून 8 रूपयांपर्यंत घसरल्याने श्रीगोंदा, नगर, श्रीरामपूर व अन्य ठिकाणचे लिंब उत्पादक चिंतेत आहेत. एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी, काष्टी व अन्य गावात सुमारे दररोज 300 मेट्रिक टन लिंबाचे उत्पादन होत आहे. मात्र भाव घसरल्याने लिंबू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या उत्तर भारतातील बाजारपेठेत लिंबू 20 रुपये किलो आहे. पण वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने व्यापार्यांनी लोणचे बनविणार्या कंपन्यांना लिंबू देण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांकडूनही मोतीमोल भाव दिला जात आहे. श्रीगोंद्याचे लिंबू नाशिक बाजारात जात होते. पण तेथेही भाव मिळत नसल्याने तेथे लिंबू पाठविणे बंद झाले आहे. नाशिकला 800 ते 1300 रूपये, नगर 500 ते 1500, श्रीरामपूर 800 ते 1500 चा भाव मिळत आहे.
कांद्यावर करडी नजर
नाशिकमधील कळवण आणि संगमनेरातील घारगावात कांदा चोरीच्या घटना घडल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे. त्यांना या कांद्यावर करडी नजर ठेवण्याची वेळ आली आहे. कळवण येथे पगार यांच्या शेतातून लाख रुपयांच्या कांद्याची चोरी झाली. तर दोन दिवसांपूर्वीच संगमनेरातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी संतोष दराडे यांच्या सतर्कतेने कांदा चोरीचा प्रयत्न फसला.
Post a Comment