माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'जस्सी जैसी कोई नहीं' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंग सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. मोनाने टीव्हीप्रमाणे सिनेमांमध्येही काम केलं. दरम्यान मोना लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा बी- टाऊनमध्ये होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार १४ डिसेंबरपर्यंत मोना तिचे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लग्नापूर्वी मोना तिचे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. याशिवाय मोना ज्याच्याशी लग्न करणार आहे तो इन्वेस्टमेन्ट बँकर आहे. सध्या मोना एकता कपूरच्या 'कहने को हमसफर है' मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेची टीम मोनाचे सीन्स आधी शूट करून घेत आहे, जेणेकरून तिला लग्नासाठी सुट्टी देता येईल. २५ दिवसांमध्ये मोना हे शूट पूर्ण करणार आहे. १४ डिसेंबरला मोनाचा सेटवरचा शेवटचा दिवस असेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, मालिकेतील मोनाच्या ट्रॅकमध्ये कोणताही बदल केला जात नाहीये. मोनाला यापूर्वी तिच्या लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली की, 'मी कधीही माझ्या खासगी आयुष्याबद्दल मीडियासमोर बोलले नाही. पण हेही खरं आहे की, ज्या दिवशी माझं लग्न होईल, मी संपूर्ण जगाला याबद्दल सांगेन.
मोना सिंगने २००३ मध्ये जस्सी जैसी कोई नहीं मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. या मालिकेत मोनाने एक अशी व्यक्तिरेखा साकारली होती जी दिसायला कुरुप असते पण ती बुद्धीमान असते. या मालिकेनंतर मोनाने 'राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी', 'क्या हुआ तेरा वादा', 'इतना करो न मुझे प्यार', 'प्यार को हो जाने दो', 'कवचः काली शक्तियों से', 'कहने को हमसफर है' आणि 'ये मेरी फॅमिली' मालिकांमध्ये काम केलं.
Post a Comment