लिओनेल मेस्सीची विक्रमी हॅटट्रिक
माय अहमदनगर वेब टीम
माद्रिद - बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्याने रियल मॅलोरका संघाविरुद्ध शानदार हॅटट्रिक नोंदविली. याचबरोबर ला-लीगा फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक ३५ हॅटट्रिकचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मोडला.
बार्सिलोनाने ही लढत ५-२ अशी जिंकली. यात मेस्सीने १७व्या, ४१व्या आणि ८३व्या मिनिटाला गोल केले. तर अँटोनी ग्रिझमन (७ मि.) आणि लुईस सुआरेझ (४३ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतक्त्यात ३४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. रियल माद्रिदचा संघ तेवढ्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गेल्याच आठवड्यात मेस्सीने बॅलन डीओर पुरस्काराने गौरविण्यात आले. ही लढत जिंकल्यानंतर बॅलन डीओरची ट्रॉफी मेस्सीने मैदानात आणली होती. आपल्याला या पुरस्काराने का गौरविण्यात आले, हे दाखविण्याचा त्याचा प्रयत्न होता. रोनाल्डोच्या नावावर ला-लीगामध्ये ३४ हॅटट्रिकची नोंद आहे. मेस्सीच्या या मोसमातील गोल संख्या बारा झाली आहे. बार्सिलोनाकडून वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना मेस्सीच्या नावावर आता ४३१ गोल जमा झाले आहेत. रोनाल्डोची लीगमधील गोलसंख्या ४२६ आहे.
Post a Comment