CM उद्धव ठाकरे ' त्यांच्यावर ' नाराज


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - वीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप नोंदवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राहुल यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपली नाराजी मांडणार असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपवर पलटवार केला होता. बलात्काराबाबत केलेल्या विधानावर मी माफी मागणार नाही, असे सांगतानाच कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागायला मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असे राहुल म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे' असे ट्विट करत राऊत यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता खुद्द उद्धव ठाकरे यांचीही तशीच भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post