नगरात 'एक होता बांबुकाका’ प्रथम
माय अहमदनगर वेब टीम
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नगर केंद्रावर यंदा रंगकर्मी प्रतिष्ठानने सादर केलेल्या 'एक होता बांबुकाका' नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. अहमदनगर जिल्हा हौशी नाट्यसंघाने सादर केलेल्या 'मोमोज' या नाटकाने दुसरा क्रमांक मिळवला. या दोन्ही नाटकांची राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत तिसरा क्रमांक समर्थ युवा प्रतिष्ठानच्या 'रात संपता संपेना' नाटकाला मिळाला.
मागील १६ नोव्हेंबरपासून ४ डिसेंबरपर्यंत नगरच्या माउली सभागृहात यंदाच्या ५९व्या राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. नगर केंद्रावर यंदा १७ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून रामदास तांबे, श्रीकांत सागर व कुंदा पी. एस. यांनी काम पाहिले. ४ डिसेंबरला शेवटचे नाटक सादर झाल्यानंतर तिन्ही परीक्षकांनी अंतिम निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाला पाठविला होता. त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चावरे यांनी शुक्रवारी निकाल जाहीर केला.
स्पर्धेची वैयक्तिक पारितोषिके अशी - दिग्दर्शन : प्रथम - शैलेश देशमुख (नाटक : एक होता बांबुकाका), द्वितीय :उर्मिला लोटके (मोमोज). प्रकाश योजना - प्रथम : मुन्ना सय्यद (एक होता बांबूकाका), द्वितीय : रवी रहाणे (अमन या शांती). नेपथ्य-प्रथम : अनंत रिसे (दास्ताँ), द्वितीय : संभाजी पिसे (शापित माणसाचे गुपित). रंगभूषा-प्रथम : नाना मोरे (अमन या शांती), द्वितीय : ज्योती कराळे (शापित माणसाचे गुपित). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : राहुल सुराणा (एक होता बांबुकाका) व रेणुका भिसे (शापित माणसाचे गुपित). अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे : प्राजक्ता प्रभाकर (अमन या शांती), पूर्वा खताळ (लहान माझी बाहुली), आम्रपाली गायकवाड (मलिका), दिव्या पाटील (रात संपता संपेना), रविना सुगंधी (दास्ताँ), श्रेणिक शिंगवी (दास्ताँ), सुरेश चौधरी (रात संपता संपेना), नवनाथ वाबळे (शेवंता जित्ती हाय), श्रीराम गोरे (अमन या शांती) व मार्दव लोटके (मोमोज).
Post a Comment