जिथे राष्ट्रवादीला बहुमत तिथे महाविकास आघाडी होणार नाही




माय अहमदनगर वेब टीम
पुणे - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच हाेणार असून तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन अधिकाधिक पदे स्वत:कडे मिळावावीत, अशी चर्चा झाली आहे. परंतु, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला बहुमत आहे, त्या ठिकाणी इतर पक्षांसाेबत महाविकास आघाडी केली जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने बालेवाडी येथे आयाेजित क्रीडा स्पर्धाेच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात एखादे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला गृहखाते देऊ नये कारण ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमाेरच सीसीटीव्ही कॅमेरे लावतील, असे वक्तव्य केले हाेते, त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी काय बाेलावे हा त्यांचा अधिकार आहे. युतीचे ज्यावेळी सरकार हाेते त्याकाळी आम्ही असे वक्तव्य केले नाही. त्यांच्या मनाला वेदना हाेत आहेत की २५ वर्षांपासून त्यांच्यासाेबत असलेला शिवसेनेसारखा मित्र त्यांना साेडून गेला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

कर्जमाफी निर्णय तिन्ही पक्षांचा
आमचे तीन पक्षांचे सरकार असून काेणी एकटा निर्णय घेत नसताे. सामुदायिक निर्णय घेतले जातात आणि राज्याचे प्रमुख ते जाहीर करतात, असे सांगत पवार यांनी शिवसेनेने कर्जमाफीच्या बाबत केलेल्या फ्लेक्सबाजीवर टाेला लगावला आहे.

कावळ्याच्या शापाने गाय काही मरत नाही'
भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनही त्यांना सत्ता मिळाली नाही, त्यामुळेच पाटील अशा प्रकारची वक्तव्ये सातत्याने करत असावेत. नागपूर अधिवेशनावेळी त्यांनी अशीच विधाने केली व मुख्यमंत्र्यांनी त्याचा समाचार घेतला. मराठीत एक म्हण आहे ‘जित्याची खाेड मेल्याशिवाय जात नाही’ आणि ‘कावळ्याच्या शापाने गाय काही मरत नाही.’ ‘चाेराच्या मनात चांदणे’ चंद्रकांत पाटील ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी नवीन सरकार सत्तेत येत असताना काहीही बाेलू नये. काेणतीही खाती काेणाकडे असली तरी राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असताे आणि ताे एखाद्या मंत्र्याचा निर्णय बदलू शकताे, असेही पवार यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post