शिवाजीराव गर्जे यांना विधानपरिषदेची लॉटरी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशीयरी यांनी शिवाजीराव गर्जे व कुमारी आदिती नलावडे यांची विधान परिषदेवर सदस्यपदी नियुक्ती केली आहे. श्री. गर्जे हे दुले चांदगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील रहिवासी असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सुरुवातीच्या काळात अकोले येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आदिवासी भागात काम केले. त्यानंतर प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. त्यांच्या अतिउत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून सन 2000 पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी समर्थपणे आजतागायत सांभाळत आहेत.
2014 मध्ये काही काळासाठी राज्यमंत्री दर्जा असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते. श्री. गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. प्रदेश कार्यालयात व पक्षात त्यांनी प्रशासन, निवडणूक नियोजन व पक्ष संघटना अशा सर्व प्रकारच्या जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांना आमदारकी देण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान यापूर्वी नगर शहरातील डॉ.ना.ज. पाऊलबुधे यांची तत्कालीन राज्यपालकडून विधान परिषदेवर नियुक्ति झाली होती त्यानंतर गर्जे यांना संधी मिळाली.
Post a Comment