बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिसाने घेतली ५० हजाराची लाच
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : बाल लैगिक अत्याचार कायदा व बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला न्यायालयातून लवकर जामीन होण्यासाठी व गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ती पंचासमक्ष स्विकारताना पारनेर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई रामचंद्र पांडुरंग वैद्य याला गुरूवार दि.१९ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारनेरच्या मिलन चौकातील हॉटेल आकाश येथे नियोजनबध्द सापळा रचून रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भाच्याचे विरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याला अटक केलेली आहे. या गुन्हयातील आरोपीला न्यायालयातून लवकर जामीन होण्यासाठी व गुन्हयाचे तपासात आरोपीचे बाजूने मदत करण्यासाठी पारनेर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई रामचंद्र पांडुरंग वैद्य याने गुरूवार दि.१९ डिसेंबर २०१९ रोजी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.आरोपी पोलिस शिपाई रामचंद्र वैद्य हा तपासी अधिकारी यांचा रायटर व मदतनीस आहे.आरोपी पोलिस शिपाई रामचंद्र वैद्य याने त्याच दिवशी गुरूवार दि.१९ रोजी पारनेर येथील मिलन चौकातील हॉटेल आकाशमध्ये पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईच्यावेळी लावलेल्या सापळ्याकामी नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पो.नि.दिपक करांडे, पो.हे.कॉ.तनवीर शेख, सतिष जोशी, पो.ना.रमेश चौधरी, प्रशांत जाधव, पो.काँ.रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पो.हे.कॉ.हारुण शेख, अशोक रक्ताटे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment