विद्यार्थीनींशी असभ्य वर्तन ; शिक्षकास महिलांनी चोपले







माय अहमदनगर वेब टीम
अकोले - अकोले तालुक्यातील वाघापूर येथील गंभीरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने अनेक मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी शिक्षकास पोलिसांनी गजाआड केले आहे. या गंभीर प्रकरणाबद्दल समाजात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

तालुक्यातील वाघापूर येथील गंभीरवाडी येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा आहे. काल गुरुवारी सकाळी ग्रामस्थ एकत्र आले. या शाळेतील पिचड या शिक्षकाने अनेक मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर गंभीरवाडी येथे अनेक मुलींशी असभ्य वर्तन करणार्‍या या शिक्षकाला अनेकवेळा समज देऊन देखील त्याच्या वागण्यात बदल झाला नाही.

या शिक्षकाने पुन्हा शाळेतील मुलींशी असभ्य वर्तन केले. यासंदर्भात गुरुवारी पालकांनी एकत्र येऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. दरम्यान या शिक्षकास काही महिला पालकांनी चपलेने मारहाण केल्याची ध्वनिचित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली. त्यानंतर ही बातमी सर्वदूर पसरली.

अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार या भागात घडला आहे. संतप्त ग्रामस्थांनी या शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अकोलेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी तातडीने याप्रकरणाची दखल घेऊन संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने अहवाल तयार केला असून तो जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी व शिक्षणअधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अकोले पोलिसांनी आरोपी-दत्तू पांडुरंग पिचड (वय- 40,मूळ गाव -पिंपरकणे, ता. अकोले ,हल्ली रा-सीड फार्म,अकोले) याचे विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 6, 8, 12 तसेच भारतीय दंड संहिता 354 ,354(अ)(1),(1),509,506 प्रमाणे दाखल केला आहे. रात्री या आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमने हे करत आहे.

शिक्षक पत्नीकडून धमकीचा आरोेप
आरोपी शिक्षकाची पत्नी ही पोलीस ठाण्याच्या परिसरात वाघापूर येथील महिला व ग्रामस्थांना दम देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.‘माझ्या नवर्‍याला अटकविले म्हणून मी एकेकाला सोडणार नाही’ असा दम त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिलांना दिला. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या कानावर ही बाब घातली आहे.

आरोपीने केला गुन्हा मान्य
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी येथील शिक्षक दत्तू पिचड यांनी ग्रामस्थांना गुन्हा मान्य केल्याचे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे समाजमाध्यमात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

कारनाम्याची माहिती
आरोपी शिक्षक काय काय कारनामे करतो याची कहाणी मुलींनी कथन केली आहे. दुपारच्या सुट्टीत शाळेच्या किचनच्या शेडमध्ये काही मुलींना बोलावून त्यांच्याशी हा शिक्षक असभ्य वर्तन करीत असे. तसेच घरी सांगू नये म्हणून दमही देत असे, असेही या मुलींनी सांगितले. या शिक्षकाच्या कृत्याने संताप व्यक्त होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post