महिला डिजीटल साक्षर म्हणजे भावी पिढी सुरक्षित - नरेंद्र फिरोदिया


महिला आयोग व अमृतवाहिनीच्या डिजीटल प्रशिक्षणाला प्रतिसाद

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः “डिजीटल युगाच्या क्रांतीची मीमांसा पोस्ट कार्ड ते व्हॉटस्-अ‍ॅप, अशी करून पाहता येईल. डिजीटल युगामुळे जीवनाला गती मिळाली आहे. महिलांनी डिजीटल साक्षरतेमध्ये सर्वात पुढे राहणे ही काळाची गरज आहे. मुलगी शिकली कुटुंबाची प्रगती झाली, ही उक्ती महिलांसाठी आता या डिजीटल युगात शालेय अभ्यासापुरती मर्यादीत राहिलेली नाही. महिला डिजीटल साक्षर झाल्या, तरच भावी पिढीची कुटुंब व्यवस्था सुसंस्कारी, वैज्ञानिक आणि सामाजिक पातळीवर मजबूत उभी राहिल,” असे प्रतिपादन ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्यावतीने महिलांसाठी डिजीटल प्रशिक्षण अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नरेंद्र फिरोदिया बोलत होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, ग्राहक मंचाच्या न्यायाधीश चारू डोंगरे, राज्य महिला आयोगाच्या प्रशिक्षक संध्या देशपांडे, सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे, अमृतवाहिनीचे संस्थापक दिलीप गुंजाळ, संजय शिंगवी, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, आय लव्ह नगरचे संपादक प्रदीप पेंढारे, फरहतचे व्यवस्थापक अतीक शेख यावेळी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, “डिजीटल युगाने जीवनशैली बदलली आहे. वेगवेगळी माहिती अ‍ॅपद्वारे लोकांपर्यंत पोचत आहे. माहितीला त्यामुळे गती आली आहे. या माहितीचा परिणाम राहणीमानावर झाला आहे. संदेशवहन प्रक्रिया बदलली आहे. सरकारने देखील त्याची दखल घेतली आहे. विविध माहिती अ‍ॅपद्वारे सरकार देत आहे. सामाजिक संस्थां देखील यात पुढाकार घेत आहेत. या डिजीटल क्रांती महिलांनी अधिक साक्षर बनले पाहिजे. समाजाचा हा महत्त्वाचा घटक डिजीटलमध्ये साक्षर झाल्यास येणारी पिढी अधिक सक्षम आणि सुसंस्कृतपणे उभी राहिल.” महिलांसाठी राज्य महिला आयोग आणि अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ राबवित असलेला हा उपक्रम डिजीटल साक्षरतेसाठी खूपच चांगला आहे. अशा उपक्रमांना भविष्यात ‘आय लव्ह नगर’चे देखील योगदान राहिली, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
संदीप मिटके म्हणाले, डिजीटल क्रांतीचे विधायक बाजूबरोबर विध्वंसक बाजू देखील महिलांनी अभ्यासली पाहिजे. सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत. त्यात सर्वाधिक महिला बळी पडल्या आहेत. त्यामुळे डिजीटल साक्षर होताना त्याच्या दोन्ही बाजूचा अभ्यास झाला पाहिजे. विजयमाला माने यांनी राज्य महिला आयोग आणि अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाने महिलांसाठी डिजीटल प्रशिक्षणासारखीच सायबर क्राईम आणि सुरक्षा याविषयीची कार्यशाळा आयोजित करावी, त्याला सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. राज्य महिला आयोगाच्या प्रशिक्षक संध्या देशपांडे यांनी महिलांसाठी सरकारने विकसित केलेल्या वेगवेगळ्या आठ अ‍ॅपची माहिती दिली. नमो, भीम, आपलं सरकार, तेजस्विनी आदीं अ‍ॅपचा यात समावेश होता.
‘आय लव्ह नगर’चे नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सामाजिक कार्यकर्त्या शारदा हौशिंग यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा अमृतवाहिनीच्यावतीने सत्कार करण्यात आला. नगर शहरातील महिलांचा प्रयास आणि समर्पण ग्रुप यांच्या सामाजिक कार्याची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. नरेंद्र फिरोदिया आणि संदीप मिटके यांच्या हस्ते या दोन्ही ग्रुपचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षणात नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे 210 महिला सहभागी झाल्या होत्या. अमृतवाहिनीचे सिराज शेख, अंबादास गुंजाळ, प्रसाद माळी, सागर विटकर, राजू पाटोळे, दिलीप खांडरे, हृतिक बर्डे, मच्छिंद्र दुधवडे, विकास बर्डे, अनिरुद्ध दुधवडे, करिश्मा शेख, प्रतिभा तळेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. छायाचित्रकार समीर मणियार, माध्यम प्रतिनिधी यतीन कांबळे, अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post