'भारत बचाओ’ महारॅलीसाठी जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्लीला जाणार
माय नगर वेब टीम
अहमदनगर - केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ डिसेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विशाल भारत बचाओ महारॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातून पाच हजार काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला जाणार अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी आधीच दिली आहे.
भारत बचाओ रॅलीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या नियोजनाची पूर्वतयारी बैठक लालटाकी येथील अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आ. डॉ सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे ,शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दीप चव्हाण, जि.प. सभापती अजय फटांगरे, जि.प सदस्य प्रतापराव शेळके,रामहरी कातोरे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, कोपरगांव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, राहता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे,जामखेड तालुकाध्यक्ष शहाजीराव भोसले, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, शेवगाव तालुकाध्यक्ष अमोल फडके, अकोले तालुकाध्यक्ष दादा वाकचौरे,पाथर्डी तालुकाध्यक्ष निसार शेख , राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शहर काँग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मयूर पाटोळे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठीकीत जिल्ह्यातून जाणा-या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वाहतूक व निवास व्यवस्थेची माहितीही देण्यात आली. यावेळी बोलताना डॉ सुधीर तांबे म्हणाले की, केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी असे सर्वच समाजघटक या सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय काँग्रसे कमिटीने आयोजित केलेल्या विशाल रॅलीला देशभरातून लाखो काँग्रेस कार्यकर्ते येणार आहेत. जिल्ह्यातूनही शेकडो कार्यकर्ते दिल्ली येथे होणा-या भारत बचाओ रॅलीत सहभागी होणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे, आ. डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली उद्या दुपारी ३ वाजता दिल्ली येथे रवाना होत आहे अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली.