मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की…



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- ज्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे महानेते बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला. याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा सोहळा हजारो लोकांच्या साक्षीने ऐतिहासिक पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचं स्मरण करून आणि संविधानला स्मरून उध्दव ठाकरे शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या 36 दिवसानंतर मुख्यमंत्री लाभला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

याच दरम्यान ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेतून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीतून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसमधुन बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे हस्तांदोलन करत अभिनंदन केले. शपथविधी सोहळा झाल्यावर उद्धव ठाकरे जनसागरासमोर नतमस्तक झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post