सहा महिन्यांत छावण्यांतील जनावरांवर 317 कोटी खर्च
माय नगर वेब टीम
अहमदनगर – टंचाईच्या काळात फेबु्रवारी ते जून 2019 आणि जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीत जिल्ह्यात सुरू असणार्या जनावरांच्या छावण्यांवर राज्य सरकारने 317 कोटी रूपयांहून अधिक खर्च केला आहे. या छावण्याच्या माध्यमातून सहा महिन्यांच्या काळात तीन लाख 50 हजार जनावरांना सकस चारा, पाणी आणि निवार्याची सुविधा देण्यात आली आहे.
जिल्ह्यात उन्हाळ्यात भीषण पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी अखेर राज्य सरकारवर जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची वेळ आली होती. या जनावरांच्या छावण्यासाठी सरकारने कडक नियमावली तयार करून छावण्या सुरू केल्या होत्या. या जनावरांचे जीपीएस टॅगिंग करण्याची सक्ती करण्यात आली होती. या टॅगिंगच्या आधारे छावणीतील जनावरांची संख्या निश्चित करून छावणी चालकांना अनुदान अदा करण्यात आले होते. जिल्ह्यात टंचाईच्या काळात सुरू करण्यात आलेल्या छावण्यांची संख्या 504 पर्यंत पोहचली होती. एकूण 3 लाख 50 हजार जनावरे छावणीत मुक्कामाला होती.
यंदा पाऊस लांबल्याने जूनअखेर मुदत वाढवून ऑगस्टअखेर छावण्या सुरू होत्या. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कर्जत आणि अन्य तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीच्या दिवसापर्यंत छावण्या कार्यरत होत्या. विशेष म्हणजे छावण्या बंद झाल्यानंतर गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक 162 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला.
जिल्ह्यात सुरू असणार्या छावण्यांसाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला आधी 260 कोटी 24 लाख 85 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. यातून प्रशासनाने छावणी चालकांची बील तपासून त्यांना 217 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. उर्वरित बीले तपासण्याची मोहिम सुरू आहे. यासह जुलै ते ऑगस्ट या कालावधीत सुरू असणार्या छावण्यांच्या बिलांसाठी जिल्हा प्रशासनाने 57 कोटी रुपयांची मागणी मंत्रालय पातळीवर केलेली आहे. लवकरच हा निधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. एकूण निधी 317 कोटी झाला असून अद्याप सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सुरू असणार्या छावण्यांची बील अदा करण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा होणार आहे. छावणी चालकांकडून बिल आल्यावर देयकाची रक्कम निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
घरावर तुळशीपत्र
जनावरांमागे किमान 10 ते 20 टक्के मार्जीन राहिल, अशी अपेक्षा ठेवून मोठ्या संख्येने छावण्या सुरू करण्यासाठी छावणी चालाकांमध्ये चढाओढ झाली. त्यानंतर महसूल प्रशासनाने पात्र संस्थांना छावण्या सुरू करण्यासाठी परवानगी दिल्या. नियमांची पुर्तता केल्यानंतर ऐनवेळी सरकार पातळीवरून वेगवेगळ्या सुचना आणि आदेश आले. त्यांची पुर्तता करतांना छावणी चालकांची दमछाक झाली. त्यातच बिल मिळण्यास विलंब झाल्याने छावणी चालकांना स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ आली.
अशी होती छावण्यांची स्थिती
नगर 66, जामखेड 69, पारनेर 41, कर्जत 97, पाथर्डी 107, श्रीगोंदा 56, शेवगाव 65, नेवासा 1, संगमनेर 2 एकूण 504.
Post a Comment