माय नगर वेब टीम
पुणेः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या एका गटाने भाजपला पाठींबा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवारांच्या बारामतीत दोन पवार गट पाहायला मिळत असून एका गटाने शरद पवार यांना पाठींबा देण्यासाठी लावलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
'आम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत!', समस्त बारामतीकर, असे शब्द असलेले हे पोस्टर असून ते सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शरद पवार हे सध्या मुंबईत असून बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीची किती आमदार सोबत राहणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेऊन राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षात परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर मला सध्या काहीही बोलायचं नसून वेळ आल्यावर मी माझी भूमिका मांडणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post a Comment