खडकीत बिबट्याची दहशत : शेतकऱ्याच्या अंगावर झडप ; सुदैवाने जीव वाचला



नागरिक भयभीत ; शेतीसाठी दिवसा वीज द्या ; पिंजरा लावण्याची मागणी

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याची दहशत संपता संपेना असे चित्र दिसून येत आहे. दररोज विविध गावांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शिकारी तसेच मानव वस्तीत बिबट्याचा वावर आढळून येत आहे. खडकी येथे बिबट्याने शेतकऱ्याच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. खडकी गावामध्ये विविध ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

     खडकी परिसरात यापूर्वी देखील बिबट्यांचा वावर आढळून आला होता. बिबट्याच्या भीतीमुळे नागरिक भयभीत झाल्यामुळे गावामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविण्यात आला होता. परंतु  शेजारील बाबुर्डी बेंद गावामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर खडकी येथील पिंजरा बाबुर्डी बेंद गावात हलविण्यात आला आहे. खडकी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी, शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 



     रविवारी ( दि.७) रोजी पहाटेच्या सुमारास हौसाराम वाडेकर हे शेतकरी घराजवळील रस्त्यावरून चालत असताना अचानक समोरून बिबट्या आला. बिबट्याने हौसाराम वाडेकर यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला परंतु वाडेकर यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला आहे. तसेच रंगनाथ दत्तात्रय बहिरट, अशोक भिमाजी कोठुळे यांनीही बिबट्या पाहिला असल्याचे सांगण्यात आले. हौसाराम वाडेकर या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालण्याचा केले्या  प्रयत्नामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. वाळकी रोडवरील गणेशवाडी परिसरात ही घटना घडली. वनविभागाच्या वतीने सखाराम येणारे, योगेश चव्हाण यांनी खडकी गावात भेट देऊन पाहणी करण्यात आली तसेच परिसरात बिबट्याच असल्याच्या घटनेला दुजारा देण्यात आला आहे.

        रब्बी हंगामातील सर्वच पिकांना पाणी तसेच खुरपणीचे काम सुरू आहेत. काही भागात लाल कांदा काढण्याचेही काम सुरू आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतामध्ये काम करण्यासाठी मजूरही घाबरत आहेत. खडकी परिसरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी तसेच पिंजरा लावून बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच भाऊसाहेब बहिरट, अनिल पोपट कोठुळे, नंदू रोकडे, शेखर कोठुळे, संदीप गंगाधर कोठुळे, सुनील रामदास कोठुळे, योगेश बहिरट, सोमनाथ कोठुळे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.


ग्रामस्थांनी काळजी घ्यावी

खडकी गावात बिबट्याचा वावर वारंवार आढळून आलेला आहे. ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा वीज मिळण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थी, नागरिक भयभीत झालेले आहेत. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. सर्व ग्रामस्थांनी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. 

....... भाऊसाहेब बहिरट ( सरपंच, खडकी )


नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहा. उपवनसंरक्षक अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ड्रोन द्वारे बिबट्यांची पाहणी करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. शेतकरी तसेच लहान बालकांची विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. पशुधन बंदिस्त जागी बांधावे.

...... शैलेश बडदे ( वनपरिमंडल अधिकारी, गुंडेगाव)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post